नाशिक – येवला उपविभागीय अधिका-यांवर एका महिला शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज येवला शहर पोलीस स्थानकात प्रांत सोपान कासार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की महिला तलाठी यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतचा पुढील तपास करण्यात येणार आहे.
येवला येथील तलाठ्यांच्या बदली प्रक्रीयेत मनमानी कारभार करत जातीय व्देषभावनेतून या बदल्या केल्या असल्याची तक्रार करत काही तलाठ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे. यातील काही तलाठ्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली आहे. मॅटने या निर्णयास २३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. तलाठी विरूध्द उपविभागीय अधिकारी हे प्रकरण सध्या येवला तालुक्यात चर्चेचा विषय बनले असतांनाच महिला तलाठीने केलेले गंभीर आरोप चर्चेचा विषय ठरला होता. या महिला तलाठीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पण, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी आपली आपबित्ती कथन करत पोलीसांकडे धाव घेत थेट तक्रार अर्ज केला. त्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली.
या महिला तलाठीने सांगितले की, येवला येथील उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी आपल्या मनमानी कारभाराने तलाठ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जे तलाठी बदलीस पात्र नव्हते त्यांच्या बदलीचे आदेश काढले तर ज्या तलाठ्यांनी विनंती बदलीची मागणी केली त्यांना दुसराच सज्जा देण्यात आला. मर्जीतील तलाठ्यांना मात्र त्यांच्या जागेवर कायम ठेवण्यात आले असून ठाणमांड्या, मर्जीतील कर्मचार्यावर उपविभागीय अधिकारी मेहरबान असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या बदली प्रक्रीयेविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. या आरोपांबाबत या महिला तलाठीने सांगितलेला हा घटनाक्रम बघा या व्हिडिओमध्ये