येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या निमित्ताने येवला शिवसृष्टी येथे बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवशौर्य गाथा हे संगीतमय महानाट्य व त्यानंतर भव्य फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार असून मराठी चित्रपट मालिकेतील कलावंत या संगीतमय महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशौर्य गाथा उलगडणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी केले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित भव्य दिव्य पुतळा बसविण्यात आला आहे. याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कडून शिवजयंतीचे औचित्य साधत संगीतमय महानाट्य शिवशौर्य गाथा व त्यानंतर भव्य फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या महानाट्याचे सादरीकरण प्रकाश भागवत त्यांच्या दिग्दर्शनाखाली होणार असून यासाठी मराठी चित्रपट मालिकेतील नामवंत मराठी कलाकार पंढरीनाथ कांबळे, संदीप गायकवाड, अजय तपकिरे, चेतना भट, विश्वजित फड़के, राधा सागर, मयूरा पलांडे, गौरी देशपांडे, रवी कुलकर्णी, भैरव मिस्री हे सादरीकरण करणार आहे. अतिशय भव्य दिव्य संगीतमय महानाट्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशौर्य गाथा उलगडली जाणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी नेत्रदीपक फायर शो होणार आहे.
या जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शिवसृष्टीत जय्यत तयारी करण्यात येत असून परिसरात विद्युत रोषणाई व विशेष सजावट करण्यात येत आहे. या सोहळ्यातून नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी अनुभवता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ.पंकज भुजबळ यांनी केले आहे.