येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाभूळगाव येथील मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून बालविवाह रोखण्याचा संदेश देत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे.तसेच या शिबिरांर्थी तर्फे २३० किशोरवयीन मुलांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.
मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेज व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोटमगाव येथे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच श्री.लहरे व ग्रामसेवक रोकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. २५ स्वयंसेवकांची चरक, सुश्रुत, वागभट शारंगधर ग्रुप यांनी शिबिरा दरम्यान केलेले उपक्रम यशस्वीरित्या जबाबदारीने पार पाडले.
शिबिर व्याख्यानमालेत डॉ.प्रा.वर्षाराणी पाटील यांनी बालविवाहाचे दुष्परिनाम या विषयावर मार्गदर्शन केले.प्रा. डॉ.एस.डी. मस्के यांनी सेंद्रिय शेती मालाचे आरोग्यास होणारे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले.संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती अभियान अंतर्गत मुख्य संविधान व्याख्याते तुषार पगारे व सुनिल लासुरे यांनी मार्गदर्शन केले.या शिबिरादरम्यान प्राथमिक शाळेतील किशोरवयीन मुला मुलींची आरोग्य व रक्तप्रमाण तपासणी, शाळेतील मुलांना स्वच्छतेचे बद्दल जनजागृती, सूर्यनमस्कार व योगासने असे उपक्रम पार पडले.
शिबिरात जगदंबा देवी मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, बाजारतळ ,वीज वितरण ठिकाण, या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गाव सर्वेक्षणासाठी गावात रॅली काढण्यात आली.या दरम्यान गावात बालविवाह रोखण्यासाठी पथनाट्य आयोजित करण्यात आले.तसेच प्रकृती परीक्षण व प्रकृतीनुसार घ्यावयाची काळजी यावर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमा दरम्यान प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात गावाशी नाते निर्माण करण्यासाठी अशाच उपक्रमांचा भविष्यात आयोजन करण्याचा सल्ला दिला.शिबिरास मातोश्री शिक्षण संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांनी मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ.संजय पाटील,रासेयो कार्यक्रम समन्वयक डॉ.बाबासाहेब शिंदे,डॉ.किरण पवार,डॉ.सागर कोल्हे,डॉ. दिपाली भालेराव यांनी नियोजन केले.