येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी १ कोटी ७४ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होऊन येवला शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
येवला शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून
स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत येवला नगरपरिषद क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच या प्रकल्पासाठी १ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.०” च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे समाविष्ट आहे. यामाध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत येवला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
येवला शहरात साकारण्यात येणाऱ्या या घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून शहर परिसरातून संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्याचा प्रकल्प उभा करून त्यातून कंपोस्ट निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुका कचरा आणि वनस्पती झाडपाला याचे संकलन करून त्यावर देखील प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागून खताची देखील निर्मिती यातून होणार आहे. त्यामुळे येवला शहर हे स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त ठरणार आहे.