येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैठणीचे शोरुम फोडून कोट्यवधींच्या पैठण्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना येवला येथे घडली. येवला – कोपरगाव महामार्गावरील लक्कडकोट पैठणीचे शोरूम मंगळवारी मध्यरात्री फोडून चोरटयानी ही चोरी केली. पैठणीबरोबरच सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केला.
चोरट्यांनी लक्कडकोट पैठणीच्या शोरूमच्या पाठीमागच्या बाजूने टॉयलेटची खिडकी तोडत टॉयलेटमधून दुकानात प्रवेश केला. या ठिकाणी स्वतःच्या हातमागावर तयार केलेले एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या १५ पैठण्या चोरट्यांनी लंपास केल्या. शिवाय वीस हजार रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा आयफोन तसेच सॅमसंग कंपनीचे तीन मोबाईल व सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला आहे. सर्व मिळून एक लाख ४८ हजाराची चोरी झाल्याचे फिर्याद प्रशांत लक्कडकोट यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान दुकानात चोरी होऊन कोट्यावधींच्या पैठण्या चोरीला गेल्याची माहिती सुनील लक्कडकोट यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे नेमकी चोरी किती हा सवाल आता उपस्थित होत आहे.