लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुणी काहीही सांगितले,काहीही प्रचार केला तरी आमचे मत केवळ छगन भुजबळ यांनाच असल्याचा ठाम निर्धार लासलगावकरांनी केला.लासलगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे जाहीर सभेत दिली.तर सभेस प्रमुख उपस्थिती असलेले अभिनेता भाऊ कदम म्हणाले की,आम्ही विचारांचे वारकरी वाहतो विकासाची पालखी.भुजबळ साहेबांनी दिलेला शब्द कधीही बदलला नाही.ते विकास पुरुष आहेत हे येथील बदल पाहून दिसते.
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज लासलगाव येथे भव्य जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील,प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,मायावती पगारे,डी.के.जगताप,सुवर्णाताई जगताप,डॉ.श्रीकांत आवारे,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,शेखर होळकर,बिपीन कटारे,किशोर सोनवणे,सचिन दरेकर,रामनाथ शेजवळ,मंगेश गवळी,दत्ताकाका रायते, दत्तूपंत डुकरे, अशोक गवळी,अशोक नागरे,विनोद जोशी,राजाभाऊ लोणारी,मधुकर गायकर,सुरेखा नागरे,डॉ.वैशाली पवार,बालेश जाधव,शिवाजी सुपनर,विलास गोरे,उत्तम नागरे,बबन शिंदे,संतोष राजोळे,पांडुरंग राऊत,युनुस तांबोळी,डॉ.अमोल शेजवळ,मेघा दरेकर,फरीदा शेख,राजाभाऊ चाफेकर,अनिल सोनवणे,कृष्णा पारखे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की,ब्रिटीश साम्राज्याला हादरा देणाऱ्या वीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मी येथे अभिवादन करतो.आदिवासी बांधवांसाठी आपण अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत.माझं अर्धा आयुष्य म्हणजे ४५ वर्षे विधानभवनात गेली आहे.२००४ मध्ये मी येवल्यात आलो तेव्हा अत्यंत वाईट स्थिती होती.गाव समोर पण तेथे जायला रस्ता नाही.मात्र २० वर्षात अफाट बदल झालाय.त्यावेळी पैठणीची ५ दुकाने होती आता ५०० दुकाने आहेत. मी बोलत नाही तर करून दाखवतो.लासलगाव मध्ये भव्य शिवस्मारक साकारले जाईल.लासलगाव विंचूरसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेच्या २६ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.गळती होणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार.या योजनेत सौर उर्जेचा वापर होणार असल्याने पाणीपट्टी कमी येईल.पालखेड कालव्याच्या उदभवावरून लासलगाव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना केली जाईल.लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम सुरु आहे. लासलगाव रेल्वे ओव्हर ब्रीज तयार होऊन ४ वर्ष झाली मात्र पोहोच रस्त्याच्या भूसंपादनासाठी अडचणी आणल्यामुळे वाहतूक सुरु नाही. मात्र मी स्वत: लक्ष घालून सहा महिन्याच्या आत ब्रीजवरून वाहतूक सुरु करणार.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नवीन पुतळा करणे आणि परिसर सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाल्याने आता काम सुरु होईल.१३ कोटींच्या निधीतून शिव नदीचे संवर्धन व सौंदर्यीकरण होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
नजिकच्या काळात होणाऱ्या विकास कामांबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,लासलगाव-विंचूर रस्ता चौपदरी तर विंचूर-खेडलेझुंगे रस्ता काँक्रीटीकरण होईल,भरवस फाटा ते कोपरगाव तालुका हद्द काँक्रीट रस्ता,पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे काँक्रीटीकरण,लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन,अतिरिक्त २० खाटांच्या इमारतीचे बांधकाम,लासलगांवला महिलांसाठी व्यायामशाळा,लासलगाव बस स्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेता भाऊ कदम म्हणाले की, आज हा उपस्थित जनसमुदाय सांगतो आहे की भुजबळ साहेब विजयी झाले आहेत. ते दिलेला शब्द पाळतात. लाडकी बहिण, मुलीना मोफत शिक्षण अशा असंख्य कल्याणकारी योजना महायुती सरकारने राबवल्या.भुजबळ यांचा मतदान यंत्रावरील क्रमांक १ आहे. ते एक नंबरचेच नेते आहेत.मला वाटल माझीच सगळीकडे हवा आहे.पण इथे पहिले तर भुजबळ यांचीच हवा आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे म्हणाले की,आमदार खमका,दमदार आणि प्रशासनावर पकड असलेला हवा.भुजबळ यांनी कोट्यावधींचा निधी आणला.तो कुणी आणू शकेल का?
रामनाथ शेजवळ म्हणाले की,नाशिकला जायला २ तास लागायचे.भुजबळ यांनी रस्त्याचे काम केले.आता थेट ४५ मिनिटात नाशिकला पोहचता येते.भुजबळ हे परीस आहेत,ते आले आणि कायापालट घडला. सुवर्णा जगताप म्हणाल्या की,लासलगाव परिसरात गेल्या वर्षभरात तब्बल ४०० कोटी रुपयांचा निधी आला आहे. हे भुजबळ साहेबांमुळेच झाले. शेखर होळकर म्हणाले की,जातीपातीच्या राजकारणाने काहीच होत नाही.भुजबळ यांनी विकासाचे राजकारण केले असल्याचे त्यांनी सांगितले.