येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धानोरे येथील मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्य तथा जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या फार्मसी विभागाच्या संचालक डॉ.रसिका भालके वारुळे यांची लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात महाराष्ट्रातील ३४२ महाविद्यालय संलग्नित आहेत.ज्यात ७८ अभियांत्रिकी महाविद्यालय,२५३ फार्मसी महाविद्यालय,५ वास्तुविशारद महाविद्यालय व इतर ६ महाविद्यालयांचा समावेश आहे.
या परिषदेची कार्यकारी परिषद नुकतीच जाहीर झाली असून डॉ.भालके-वारुळे यांची सदस्य म्हणून निवड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे यांनी केली.
डॉ.भालके यांनी फार्माकोगणसी या विषयात पदव्युत्तर पदवी व पुणे विद्यापीठातून पी.एचडी प्राप्त केली आहे. त्यांचा नावावर ३ पेटंट, ८० हून अधिक संशोधन पेपर आहेत. या अगोदर देखील त्यांनी पुणे विद्यापीठाचा अभ्यास मंडळावर काम केले आहे. त्यांचा प्रशासन, अध्यापन व संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्याने त्या या पदासाठी पात्र ठरल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी देखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
मातोश्री फार्मसी महाविद्यालयात देखील त्यांनी अनेक विद्यार्थीपूरक उपक्रम राबविले असल्याने त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन ही नियुक्ती झाली आहे. सदर निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार किशोर दराडे व संचालक रुपेश दराडे यांनी समाधान त्यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.