येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. यापुढील काळात केवळ निधी अभावी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी अपुरी राहील असे कदापिही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मियांना सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण केलं असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून व संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित सुमारे चार एकर जागेत भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येवला शहरात पार पडले. यावेळी जनता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ,डॉ.शेफाली भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, श्रीमती मायावती पगारे, पंढरीनाथ थोरे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विष्णुपंत म्हैसधुने,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, हरिश्चंद्र भवर, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, किसनराव धनगे, जलचिंतनसेलचे अध्यक्ष मोहन शेलार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, डॉ.श्रीकांत आवारे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सुवर्णाताई जगताप, संध्या पगारे, शहराध्यक्ष दिपक लोणारी,बाळासाहेब कर्डक,राजेंद्र डोखळे, मच्छिंद्र थोरात, रतन बोरनारे, अंबादास खैरे, मंगेश गवळी, डॉ.श्रीकांत आवारे,सचिन दरेकर, दत्तूपंत डुकरे, दत्ताकाका रायते, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, राजश्री पहिलवान, सुरेखा नागरे, सुभाष पाटोळे, नानासाहेब लहरे, गणपत कांदळकर, पांडुरंग शेळके, मिननाथ पवार, गणेश डोमाडे, शेखर होळकर,अतुल घटे, मुकेश जावळे,आरिफ तांबोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे भाग्य मला येवलेकरांमुळे मला लाभले. येवला ही क्रांतिकारकांची भूमी आहे. याठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिनिधित्व करत हजारो कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहे. मांजरपाड्या सारखा महत्वपूर्ण प्रकल्प त्यांनी पूर्ण करत येवल्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. येवल्यातील भव्य दिव्य प्रशासकीय संकुल त्यांनी उभ केल असून येवल्याच्या चेहरा मोहरा बदलण्यात मंत्री छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज येवला शहरात भव्य दिव्य अशी शिवसृष्टी त्यांनी उभी केली आहे. राजस्थान मधील कारागिरांच्या माध्यमातून विशेष दगड वापरून, भव्य दरवाजे, शिल्प, संग्रहालय यासह उभे करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी उभी केली आहे. महाराष्ट्रामध्ये सिंहासनावर बसलेला पहिला भव्य दिव्य पुतळा असल्याचे सांगत नव्या पिढीला धैर्य शौर्य आणि गौरवशाली इतिहास सर्वांसमोर पोहचविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करून त्यांचा इतिहास पुढेही कायम रहावा यासाठी त्यांच्या किल्ल्यांचा विकास आपलं सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली. यामध्ये मुक्तिभुमी, महात्मा फुले नाट्य गृह, प्रशासकीय इमारत, पैठणी पर्यटन केंद्र, विविध स्मारके आपण उभी केली. त्यातील एक महत्वपूर्ण काम शिवसृष्टी असून येवल्याला भूषवाह ठरेल असा शिवसृष्टी प्रकल्प आपण चार एकर जागेत उभा केला आहे. हा भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र भरातून शिवप्रेमी येथे गर्दी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्पाचे काम अद्याप अधिक बाकी आहे. पहिल्या टप्प्यात महाराजांच्या पुतळ्यास काही महत्वाच्या कामे करण्यात आले. राजस्थान मधील अनेक कारागीर या प्रकल्पाच्या काम करत आहेत. महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे शिल्पे भित्तीचित्रे या म्युरल्सचे कोरीव काम राजस्थानमध्ये सुरु आहे.शिवकालीन शस्त्रारांचे आणि गड किल्ल्यांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडियो व्हिज्युअल रूम ,फाऊटन्स व गार्डन ही सर्व कामे आपण लवकरच करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. या रयतेच्या राज्याची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी हे पोवाडे गायले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे कुठलही नुकसान होऊ दिलं नाही. त्यांना आर्थिक पाठबळ दिलं. त्यांच्या अडचणींची सोडवणूक करत त्यांना जगवल. या शेतकरयांना सरकारी सुविधा देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्मियांचा समावेश होता. सर्वधर्म समभाव या नात्याने त्यांनी आपले रयतेच राज्य उभ केलं. मंदिरांसह मस्जिद त्यांनी उभ्या केल्या. कुठलाही धर्मभेद न करता केवळ अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध त्यांनी लढा दिला असल्याचे सांगितले. या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम होण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांचे श्रम अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये दिलीप खैरे, वसंत पवार या सहकाऱ्यांनी देखील या प्रकल्पाच्या साकारण्यात महत्वाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर, डॉ.नागेश गवळी यांनी केले.
असा आहे शिवसृष्टी प्रकल्प……
मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टी प्रकल्पात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्टीत पुतळा बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदरबारा प्रमाणे असणार आहे. शिवसृष्टीचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला असलेले तीनही दरवाजे सागवानी लाकडाचे असुन एक एका दरवाजाचे वजन दोन टन इतके आहे. शिवसृष्टीत महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्त्तीचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडीओ व्हिज्युअल हॉल, सुरेख गार्डन, बुरुजांचा समावेश असलेली संरक्षण भिंत आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प राजस्थान येथून घडवून आणलेल्या दगडात तेथील कारागिरांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. पुरातन शैलीची साक्ष देणाऱ्या स्लॅब स्ट्रक्चर मध्ये गॅलरी बांधण्यात येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे शिल्प तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक कान्होजी जेधे, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर, महाराजांचा खास विश्वासू मदारी मेहतर, शुरयोद्धे बाजीप्रभू देशपांडे, स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर, स्वराज्य संग्रामाचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर, स्वराज्याचे शूरवीर जिवा महाला, रणमर्द मावळा येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, अजिंक्य सरखेल कान्होजी आंग्रे, शूरवीर शिवा काशिद, शूरवीर रामजी पांगेरा, आरमार प्रमुख सिद्धी हिलाल यांच्यासह महत्त्वाचे सरदार व मावळ्यांच्या शिल्पांचा यामध्ये समावेश आहे.
असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा
शिवसृष्टीत बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ फूटी सिंहासनाधिष्टीत ब्राँझ धातूचा आहे. रायगडावरील तसेच विधानभवनात बसविण्यात आलेल्या पुतळ्यासारखाच हा पुतळा आहे. या पुतळ्याची रुंदी ८ फुट असून पुतळ्याची उंची १२ फुट असणार आहे. पुतळ्याचे एकूण वजन ५ टन इतके आहे. या पुतळयासाठी १५ फुट खोलवरुन कॉक्रीट चौथरा उभारण्यात आला आहे. यावर राजस्थान येथून घडवलेले नॅचरल स्टोन व मार्बलचा वापर करण्यात आला आहे. हा पुतळा कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ आणि नंदु पांचाळ यांच्या हस्ते साकारण्यात आले आहे. तर आर्किटेक्ट सारंग पाटील यांनी प्रकल्पउभारण्यात विशेष योगदान दिले आहे.
शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रमाने जिंकली शिवप्रेमींची मने…
येवला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासह कलाकारांनी ‘सरनार कधी रण’ या प्रयोगाचे सादरीकरण केले. तर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गीतांचे तर सुप्रसिद्ध शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे पोवाडे तसेच महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
विशेष फायर शो
शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर विशेष आकर्षक फायर शो पार पडला. या फायर शोच्या माध्यमातून येवलेकरांना नयनरम्य सोहळा अनुभवता आला.
यांचा झाला विशेष सन्मान
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, सुप्रसिद्ध शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे, सरिता सोनवणे, मूर्तिकार, बाळकृष्ण (दाजी) पांचाळ व नंदकिशोर पांचाळ, वास्तूविशारद आर्की.सारंग पाटील मक्तेदार पंकज काळे यांचा सन्मान करण्यात आला.
येवल्याच्या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन
येवला मतदारसंघात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.