येवला – येवला तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दोन रस्त्यांना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची दर्जोन्नती झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ८० पासून खामगाव देवठाण भुलेगांव आड सुरेगांव वाघाळे खरवंडी प्रमुख जिल्हा मार्ग ७६ ला मिळणाऱ्या २२.५०० किमी लांबीच्या इतर जिल्हा मार्ग २२ व ग्रामीण मार्ग १९६ या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग १७९ क्रमांक तर राज्य महामार्ग २५ पासून राजापूर ते रेंडाळे खरवंडी रहाडी या १५ किलोमीटर लांबीच्या ग्रामीण मार्ग ६७, ५४ व ११५ ला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८० क्रमांक प्राप्त झाला आहे. येवला तालुक्यातील या दोन रस्त्यांना मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या दर्जामुळे सदर रस्त्यांच्या सुधारणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्यांचा फायदा होणार आहे.