येवला – कोरोनाचे संकट असल्याने विकास कामांवर काही मर्यादा येत होत्या. त्याचबरोबर अतिवृष्टीसह अनेक संकटे राज्यावर आली आहेत. या परिस्थितीतूनही मार्ग काढत शासनाच्या माध्यमातून विकास कामे करत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी विकास कामांमध्ये लक्ष घालून ही कामे पूर्णत्वास आणावीत, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला मतदारसंघांतर्गत निफाड तालुक्यातील ४२ गावांच्या परिसरात आज पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास, ठक्कर बाप्पा, समाज कल्याण, जिल्हा क्रीडा, ग्राम निधी, जिल्हा नियोजन, मुलभूत सुविधा, जनसुविधा, आमदार निधी, सार्वजनिक बांधकाम यासह विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे १० कोटी २७ लक्ष ५० रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, ब्राम्हगणगांव सरपंच प्र. वि. चौधरी, उन्मेश डुंबरे, अनुप वनसे, सरपंच दत्तात्रय डुकरे, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, येवला पंचायत समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नांदूशेठ डागा, ज्ञानेश्वर शेवाळे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, बबन शिंदे, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उपभियंता ए. पी. गोसावी, गट विकास अधिकारी संदिप कराड, उपअभियंता आर. ए. फारुखी आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाची अद्यापही तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लँटची निर्मिती करणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांनी अविरतपणे काम करत अन्न, धान्याचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. शेतकऱ्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या काळात राज्यात ५५ हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ८.५ लाख टनाहून अधिक अन्न धान्याचे वाटप करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासाची कामे ठप्प असतांना देखील येवला मतदारसंघात विकासाची कामे अविरत सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी योग्य नियोजन केल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र शासनाकडून विकासाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज निफाड तालुक्यातील ब्राम्हाणगांव (वनस) अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण, रस्ता कॉक्रिटीकरण व भूमीगत गटार करणे, जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत व्यायामशाळा बांधणे कामाचे भुमीपूजन, ग्राम निधी अंतर्गत वॉटर फिल्टर बसविणे, २७०२ योजने अंतर्गत दोन साठवण बंधाऱ्या कामाचे लोकार्पण, वनसगांव येथे २५१५ योजने अंतर्गत वनसेबाबा देवस्थानचे सुशोभिकरण, मुलभूत सुविधा योजने अंतर्गत गोरक्षनाथ मंदिराजवळ सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर सारोळे खुर्द येथे पिंपळगांव ते लासलगांव रस्त्यावरील सेलू नदीवर मुंजोबा फाट्याजवळ पुलाचे, आमदार निधी अंतर्गत सभामंडप कामाचे, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सभामंडप कामाचे, समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीतत सभामंडपाचे, समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीतत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे तसेच जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभुमी बैठक व्यवस्था, स्मणशानभुमीत अनुषांगिक कामाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच लासलगांव येथे पिंपळगांव ब. पालखेड लासलगांव मनमाड रस्त रामा क्र. २९ कि.मी. (खानगांव फाटा ते लासलगांव) रस्ता कामाचे, पिंपळगांव (ब) पालखेड लासलगांव मनमाड रस्ता रामा क्र. २९ कि.मी. (खानगांव फाटा ते लासलगांव) कॉक्रिट गटार कामाचे भुमीपूजन करण्यात आले.