येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा व दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी येवल्यात श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा विविध हिंदू संघटनांकडून तहसील कार्यालय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हाताला काळया पट्ट्या बांधून घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. या मोर्चात महिला व तरुणीचा मोठा सहभाग होता. आफताबने दिल्ली येथे श्रध्दा वालकर हिचे ३५ तुकडे करत निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेमधून एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. तरी उपाय म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.