येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालूक्यातील चिचोंडी येथील वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी बाजारात पणत्यांची विक्री करत आहे. या तरुणीचे नाव कोमल दत्तात्रय चव्हाण असून ती पुणे येथे बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दिवाळी निमित्त कोमल सध्या गावी आली असून घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने कुटूंबाला हातभार लावण्यासाठी चक्क येवल्याची बाजारपेठ गाठली. येथे पणत्याचे दुकान थाटत तिने विक्री सुरु केली. आई-वडिलांची परिस्थिती नसतांनाही तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टर बनविण्यासाठी पोटाला चिमटा घेत वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे पाठविले. आपल्या मुलीला शिकुन मोठे करायच हे त्यांच स्वप्न कोमल पूर्ण करीत असतांनाच तिने घरच्यांना अधिक मदत व्हावी म्हणून स्वत बाजारपेठेत दुकान थाटत पणत्या विक्री सुरु केली आहे. सध्या दिवाळीची बाजारात खरेदी साठी धामधूम सुरु आहे. बाजारपेठेत आकाश कंदील, पणत्या, मिठाई, कपडे अशी विविध प्रकारची दुकाने थाटलेली असतांना या तरुणीच्या दुकानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.