अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील कोटमगाव नगरी हरी नामाच्या गजराने दुमदुमली. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल मंदिर आहे. असे मंदिर भारतात कोठेही आढळत नाही. येथील मंदिरात विठ्ठल मूर्तीमधील एक हात कमरेवर तर दुसरा हात खाली आहे. हे इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही. देवषयनी आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते यात्रेसाठी तालुक्यातीलच नव्हे तर शेजारील तालुक्यातून शेकडो भाविक येत असतात. ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता शेकडो दिंड्या येथे दाखल होत असतात. आज पहाटे उत्तमराव वाळुंज यांचा हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीस सपत्नीक अभिषेक करण्यात आला. तसेच विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच तालुक्यात असेच पर्जन्यमान राहूदे म्हणून विठ्ठलास साकडे घातले. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून येवला शहर पोलीस ठाण्याचे वतीने स्वतः पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,उपनिरीक्षक मनोहर मोरे पोलीस कर्मचारी चंद्रकांत निर्मळ, राजेंद्र पाटील आदिनी चोख बंदोबस्त ठेवला आहे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य सेवा,पिण्याचे पाणी,स्वयंसेवक,सफाई कामगार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच देवस्थान ट्रस्ट च्या वतीने येणाऱ्या भाविकांना चहा,फराळाचे व खीचडीचे वाटप करण्यात आले.