येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील फळ व्यापारी यांची १३ लाखाची फसवणुक करणा-या आरोपीस येवला शहर पोलीसांनी बुलढाणा येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. शहरातील कचेरी रोड येथील फळविक्रेता व्यापारी मोहसीन सैय्यद यांना बुलढाणा येथील राहणारा शेख अमजद शेख मोहम्मद बागवान याने सुमारे १३ लाख रुपयाचे डाळींब सुमारे २ वर्षापूर्वी येवला येथून घेऊन गेला होता. व्यापारी मोहसीन सैय्यद सदर डाळींबाचे पैसे यांनी वारंवार अमजद शेख मोहम्मद बागवान यांच्याकडे मागून देखील देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने येवल्यातील व्यापारी मोहसीन सैय्यद यांनी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर येवला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे सदर बुलढाणा येथून फसवणूक करणाऱ्या ताब्यात घेतले असून सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १९ जून पर्यंत पोलीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनानुसार येवल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस हवालदार दिपक शिरुड, पो. कॉ. बाबा पवार, मनिषा खांडेकर, हेमंत गिलबिले या येवला शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.