येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यातील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळयातील मुख्य आरोपी अजय जैनसह अक्षय छाजेड यांना गजाआड करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. २०२१ मध्ये येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयात संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व संस्थेचे कर्मचारी अशांनी संगणमत करून खातेदार व ठेवीदार लोकांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे अमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांचे पैशांचा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची रक्कम २१,९६,९९,८५०/- रूपयांची फसवणुक केली होती.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास अटक करणेकामी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले होते. सदर गुन्हयातील आरोपी अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांमध्ये आपले अस्तित्व लपवुन वास्तव्य करत होता. त्यानुसार तपास पथकाने त्याचे सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीय माहीती प्राप्त केली असता, तो संभाजीनगर जिल्हयात असल्याचे समजले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संभाजीनगर जिल्हयातील वाकुंज एम.आय.डी.सी. परिसरात शोध घेतला असता, तो मनमाड शहरात गेला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली.
या माहितीवरून आरोपी १) अजय भागचंद जैन (छाजेड), रा. श्रीकृष्ण कॉलनी, विंचुर रोड, येवला, ता. येवला यास मनमाड शहारातील माधवनगर परिसरातून पाळत ठेवून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याचेसोबत नमुद गुन्हयातील फरार आरोपी २) अक्षय रविंद्र छाजेड, रा. श्रीकृष्ण कॉलनी, विंचुर रोड, येवला यास देखील ताब्यात घेतले आहे. यातील दोन्ही आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची ४ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल तरारे हे करीत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सदर गुन्हयाचे तपासात केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, चापोना फड, तसेच पोना हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदर आरोपींचा कौशल्याने शोध घेवून त्यांना अटक केली आहे.