नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक रणजित शिवसिंग गोशिंगे याला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेत जमिनीसंदर्भातील हुकुमनामा काढून देण्यासंदर्भात गोशिंगे याने ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत सापळा रचण्यात आला. अखेर गोशिंगे दुय्यम निबंधक कार्यालयातच ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसीबीचे पथक करीत आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.