नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपला भारत देश सर्वांनाच प्रिय आहे. अगदी लहानपणापासून आपण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणतो की, आम्ही भारताचे नागरिक आहोत. परंतु काही वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने भारतीय नागरिकांना परदेशात स्थायिक होण्याची वेळ येते, किंवा निर्णय घ्यावा लागतो. वर्षाकाठी तब्बल लाखभर नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडले आहे. सरकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संसदेत ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षात 3.9 लाख नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले असून हे नागरिक जगातील 103 देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र अमेरिकेने सर्वाधिक भारतीयांना नागरिकत्व दिले. लोकसभेत हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला लेखी उत्तरासह गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.
या सर्व नागरिकांनी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय नागरिकत्व सोडल्याचे मंत्री म्हणाले. सदस्याने 2019 ते 2022 वर्षात नागरिकत्व सोडलेल्या भारतीयांची माहिती मागितली होती. राय यांनी लोकसभेत मांडलेल्या आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 दरम्यान नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 3,92,643 होती. यामध्ये 2019 मध्ये 1,44,017 भारतीयांनी नागरिकत्व सोडले, तर 2020 मध्ये 85,256 भारतीय आणि 2021 मध्ये 1,63,370 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. 2019 ते 2021 पर्यंत एकूण 103 देशांनी भारतीय नागरिकांना त्यांचे नागरिकत्व दिले.
सरकारी आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 दरम्यान अमेरिकेने 1,70,795 भारतीयांना नागरिकत्व दिले आहे. यामध्ये अमेरिकेने 2019 मध्ये 61,683 भारतीयांना, 2020 मध्ये 30,828 भारतीयांना आणि 2021 मध्ये 78,284 भारतीयांना नागरिकत्व दिले. तीन वर्षात ऑस्ट्रेलियात ५८,३९१ , कॅनडात ६४,०७१ , ब्रिटनमध्ये ३५,४३५ , जर्मनीमध्ये ६,६९० , इटलीमध्ये १२,१३१ , न्यूझीलंडमध्ये ८,८८२ , चीनमध्ये १,४५४ आणि पाकिस्तानमध्ये 1,454 भारतीयांना नागरिकत्व मिळाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
यादरम्यान प्रत्येकी एका भारतीयाने बुर्किना फासो, इथिओपिया, माली, पापुआ न्यू गिनी, सुदान आणि इराकचे नागरिकत्व घेतले. अमेरिकेला सर्वाधिक भारतीयांची पसंती आहे. 2021 या वर्षात 1.63 लाख नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं शेअर केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी 78,000 हून अधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तर कॅनडा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.
Yearly Lakh Indian People gave up Citizenship Record