नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूरशिक्षणाच्या माध्यमातून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचे स्त्रोत उपलब्ध करून दिले आहेत. मुक्त विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू दिवंगत डॉ. राम ताकवले यांनी सुरू केलेली ही शिक्षणाची गंगोत्री समृद्ध होत गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली व्याप्ती वाढवत नेण्याची क्षमता असलेल्या या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेताना विद्यार्थीभिमुख धोरणांची आखणी व अंमलबजावणी याचा साकल्याने विचार करणार असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना, रोजगाराभिमुख शिक्षणक्रम आणि पदवी शिक्षणक्रम ऑनलाईन स्वरूपात सुरू करणे यावर भर देण्याचा मानस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला.
प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्याकडून स्वीकारला. याप्रसंगी एक वर्षाहून अधिक काळ प्रभारी कार्यभार सांभाळणारे कुलगुरू डॉ. पाटील यांना विद्यापीठाच्या वतीने निरोप देण्यात आला.
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणक्रमांची व्याप्ती अधिकाधिक कशी वाढवता येईल, यावर भर द्यावी लागेल. येत्या काळात संशोधनाला चालना दिली जाईल. मुळात संशोधनाला पैसा लागतो, ही मानसिकता आता काढून टाकली पाहिजे. स्थिती, संबंध, कारण आणि परिणाम या तत्वांच्या आधारे संशोधन प्रणालीकडे पाहिले पाहिजे. वर्षभरात अभिमानाने सांगता येईल अशी स्थिती संशोधन क्षेत्रात आपल्या विद्यापीठाने गाठायला हवी आणि ती आपण गाठू असा मला विश्र्वास आहे. मी या विद्यापीठातून काही घ्यायला आलेलो नाही, द्यायला आलेलो आहे. या सध्याच्या महागड्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सर्वसाधारण घटकांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवायचे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे ऑनलाईन शिक्षणक्रम सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात दूर शिक्षणाला सर्वाधिक महत्व प्राप्त होणार असल्याने आपल्याला एक मोठी संधी आहे.
ज्ञाननिर्मिती, ज्ञानाची साठवणूक, ज्ञानाची उपलब्धता आणि ज्ञानातून संपत्ती या पेक्षा वेगळी काय व्याख्या असते विद्यापीठाची? या संपत्तीच्या समसमान वाटपातूनच या जगात सुबत्तेची नांदी होऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची क्षमता आपल्या विद्यापीठात आहेच. त्यासाठीच येत्या काळात सूक्ष्म नियोजनातून विकास आराखडे आखले जाऊन विद्यापीठाच्या आगामी वाटचालीची दिशा ठरवली जाईल. विद्यापीठाला भेडसावणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरतेसारख्या समस्याही त्वरित सोडवण्याच्या दृष्टीने उद्यापासूनच भरतीप्रक्रियेवर काम सुरू केले जाईल. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया आगामी काळात राबविली जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाहीही कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी दिली.
डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजातील अनेक समस्या या काळात सोडविता आल्या आणि नॅकसारख्या महत्वाच्या प्रक्रियेतून विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळवून देता आला याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. वर्षभरातील कारकीर्दीचा आढावा घेऊन त्यांनी नवनियुक्त कुलगुरू प्रा. सोनवणे यांचे स्वागत केले. कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. कविता साळुंके, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सुनील साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. उपकुलसचिव डॉ. कैलास बोरसे यांनी आभार मानले.
YCMOU Vice Chancellor Sanjiv Sonawane