नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला. डॉ. प्रकाश देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रभारी कुलसचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत विनंती केल्यावरून कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांनी हा निर्णय घेतला.
नवनियुक्त प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील १९९२ पासून विद्यापीठ क्षेत्रात कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व सोलापूर विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच सोलापूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. जुलै २०२२ पासून डॉ. देशमुख यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार होता. तो काल श्री. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.
कुलगुरुपदही रिक्त
दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू पदही रिक्त आहे. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठाला कुलगुरू नाहीत. तो पदभारही अन्य विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे देण्यात आला आहे. आता विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिवही नसल्याचे स्पष्ट होत आहे.
YCMOU Open University Kulsachiv Responsibility