नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘ज्ञानगंगा घरोघरी ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापना करण्यात आली. गोरगरीब व ग्रामीण, आदिवासी, दुर्बल दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सर्वांना शिक्षण, तेही माफक दरात आणि सोयीच्या ठिकाणी उपलब्ध व्हावे, असा या विद्यापीठाचा उद्देश आहे. परंतु या उद्देशाला बाजूला ठेवत मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक शुल्कात बेसुमार वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शैक्षणिक शुल्कात वाढ करून विद्यापीठाला नफा कमवायचा आहे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
इतक्या टक्क्यांची वाढ
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने यावर्षी सर्वच अभ्यासक्रमासाठी आपल्या शैक्षणिक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ प्रचंड मोठी आहे. विद्यापीठाने बी. ए. आणि बी. कॉम. प्रथम वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात १७०२ वरून २९८८ रूपयांपर्यंत वाढ केली असून ही वाढ ७५ टक्के इतकी आहे. याशिवाय बी. एस. सी, डी. सी. एम. आणि एम. ए. सह इतर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात ३५ ते ५५ टक्क्यांनी वाढ केली असून मुक्त विद्यापीठाच्या या धोरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे आता अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. खरे तर उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील विविध घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या विद्यापीठाच्या धोरणामुळे महाराष्ट्रात आजपर्यंत ७५ लाखांच्यावर विद्यार्थी मुक्त विद्यापीठामुळेच पदवीधर होऊ शकले. मात्र आता प्रत्येक अभ्यासक्रमात विद्यापीठाने अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती
मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना जवळपास पाच लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. येथे प्रवेश घेणारे विद्यार्थी हे सामान्यत: गरिब, कामगार, नोकरदार आणि छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या वर्गातील आहेत. त्यामुळे या फी वाढीमुळे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सुमारे ६ लाखांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र आता ही संख्या मागील शैक्षणिक वर्षात पाच लाखापर्यंत येऊन पोहोचली. यंदा अचानक विद्यार्थ्यांच्या सर्वच शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात मुक्त विद्यापीठाच्या या निर्णयाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.
ही सवलतही काढून घेतली
आतापर्यंत दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. प्रवेश शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब असो की एकाच टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची अट असो, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती आहे. मात्र दुसरीकडे या अविवेकी व निर्दयी फी वाढीबद्दल विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांकडून कुठेही आवाज उठलेला दिसत नाही. मुक्तचे विद्यार्थी हे महाराष्ट्रभर आहेत. तसेच, ते असंघटित आणि आपल्याच विवंचनेत असल्याने या फी वाढीची ओरड कुठेही दिसून येत नाही.
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
YCMOU Open University Courses Fee Hike Students
Education Nashik