नाशिक – केवळ देशभरात आणि राज्यातच नव्हे तर नाशिक शहरात देखील ओमिक्रॉनचा धोका वाढला असून गंगापूर रोड परिसरात एक दहा वर्षे बालकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि परीक्षा यासंदर्भात काय निर्णय घ्यावा? याची सर्वांना चिंता वाटत आहे. विशेषत: विद्यापीठ स्तरीय परीक्षांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
त्यातच आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुन्हा एकदा ऑफलाइन परीक्षा ऐवजी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक ही हिवाळी सत्रातील ही परीक्षा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार होती, परंतु आता ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शैक्षणिक सत्र 2021 – 22 च्या हिवाळी परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्याचा निर्णय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला असून ही ऑनलाइन परीक्षा दि. 8 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर पदवी यासारख्या सुमारे 56 अभ्यासक्रमाच्या या परीक्षा होणार असून मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेल्या आहेत.
सर्व परीक्षा संदर्भात अद्याप सविस्तर माहिती देण्यात आली नसली तरी ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुमारे ५०ते ८० गुणाच्या असून त्यात दोन गुणासाठी एक असे ४० प्रश्न असतील. तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असून यात गैरप्रकार होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी वेब कॅमेरा, विविध अॅप आदिचा उपयोग करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात येणार आहे. तसेच याची कडक अंमलबजावणी देखील करीत करण्यात येणार असल्याचे मुक्त विद्यापीठाच्या कडून सांगण्यात आले
यापुर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता . पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे एक लाख ४० हजार विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याविषयी अंतिम निर्णय होत नव्हता.
मुक्त विद्यापीठात प्रत्येक वर्षी सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम, द्वितीय वर्षातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा द्यावी लागली. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे काही विषय बाकी असतील त्यांनाही परीक्षा द्यावी लागली. त्यादृष्टिने विद्यापीठाशी संलग्न साडेसहा कर्मचार्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले. लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठात कर्मचार्यांना प्रशिक्षण मिळाले होते.
आता फेब्रुवारीत होणारी परीक्षा ऑफलाईन ऐवजी विद्यापीठ ती पुन्हा ऑनलाईन घेण्याचा विचार करत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ऑनलाईन परीक्षा घेण्यास परवानगी आहे. त्यादृष्टीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करुन परीक्षा घेण्याचा विचार विद्यापीठ करत आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.