रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दरवर्षी प्रमाणे यात्रेचा माहोल नसला तरी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीसंत निवृत्तीनाथांची यात्रा संपन्न होत आहे. सलग दुसर्या वर्षी यात्रा रद्द झाली आहे. मात्र मागील वर्षाच्या मानाने यावर्षी बरेच निर्बंध शिथिल केल्याने वारकरी सुखावला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे यात्रा कालावधीत नाथांचे मंदिर मानाच्या दिंड्यांचे मोजक्याच मानकर्यां व्यतिरिक्त इतरांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते मात्र यावर्षी नियमांची पुर्तता करणार्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. ज्यांचेकडे मास्क नव्हते त्यांना मंदिर प्रशासनाने मास्क उपलब्ध करुन दिले.
दरवर्षी सहाशेहून अधिक दिंड्या आणी तीन लाखांच्या जवळपास भाविक यात्रेला हजेरी लावायचे मात्र यावर्षी दिडशेच्या आसपास पायी दिंड्यांनी हजेरी लावली. मात्र दिंडीतील भाविकांची संख्या त्यामानाने अत्यल्प होती. परंपरेत खंड पडायला नको म्हणून दिंडीतील वारकर्यांची संख्या कमी होती. तर यात्रेला पन्नास हजारांच्या आसपास भाविकांची उपस्थिती दिसून येत होती. टाळमृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सर्वत्र ऐकु येत होता. यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी कुशावर्तातील स्नान, नाथांचे दर्शन, ब्रह्मगिरी पर्वतावरील दर्शन आणी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यांना महत्वाचे स्थान आहे. मागील वर्षीच्या मानाने हे सर्व देवदर्शन सुरळीत झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. गुरुवार पासुनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला भाविकांचा ओघ वाढला आहे.यावर्षी यात्रेतील दुकाने, मनोरंजनाची साधने, तमाशा फड यावर बंदी घातल्याने तसेच भाविकांची संख्याही कमी असल्याने रस्ते मोकळे वाटत आहे.
नाथांच्या समाधीची महापुजा
आज एकादशी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने रात्री अकरा वाजता मंदिर संस्थानच्या वतीने श्री निवृत्तीनाथांच्या संजिवन समाधीची महापूजा धर्मदाय आयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रशासक राम लिप्ते, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, माणिक महाराज मोरे देहूकर, भैय्यासाहेब पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तर शासकीय महापुजा पहाटे सहा वाजता संपन्न झाली. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर कोणी मान्यवर शासकीय महापुजेला येणार नसल्याने आज पहाटे सहा वाजता नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सायली शिखरे त्यांचे पती हर्षल शिखरे, आमदार हिरामण खोसकर, आळंदीचे हभप चैतन्य महाराज वाडेकर, यांचे हस्ते संजीवन समाधीची महापुजा केली. यावेळी प्रशासक अॅड. भाऊसाहेब गंभिरे, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, शामराव गंगापुत्र, भाजपाचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अरुण मेढे, बहिरु मुळाणे, किरण चौधरी, शेखर सावंत नगरसेवक, नगरसेविका, न.पा. इंजिनिअर अभिजित इनामदार, पो. नि. संदिप रणदिवे, आदी उपस्थित होते. पुजेचे पौरोहित्य वेदमुर्ती हभप. जयंत महाराज गोसावी यांनी केले.
रथ मिरवणूक सोहळा
यात्रेचे औचित्य साधुन परंपरेनुसार श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपारिक पध्दतीने संपन्न करण्यात आला. दुपारी ठीक ४ वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली. रथ पानाफुलांनी सजवुन त्यावर नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथाला बैलजोडी जोडून रथाची पुजा करण्यात आली. ठिक ४.३० वाजता रथ मंदिरासमोरून हालला. सर्वात पुढे बॅडपथक, नंतर झेन्डेकरी, त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थांनचे विश्वस्त, दिंड्यांचे मानकरी, नामवंत किर्तनकार, त्यामागे नाथांचा रथ, रथामागे भाविक, असा सर्व लवाजमा निघाला. रथ अल्पबचत भवन, चौकीमाथा, सुंदराबाई मठ, तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यम्बकेश्वराच्या मंदिरात पोहचला. रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवाशिनींनी नाथांच्या प्रतिमेचं औक्षण केले. मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यम्बकेश्वराची भेट घडविण्यात आली. नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान करण्यात आली. मंदिराच्या प्रांगणात बराचवेळ अभंग गायन करण्यात आले. यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला. रथ लक्ष्मीनारायण चौक, मेनरोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला. तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला.त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे व त्यांचे सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.