कोलकाता – बंगाल आणि ओडिसाच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून जोरदार वारे आणि पावसामुळे किनारी भागातील शेकडो गावे पाण्यात गेली आहेत. लाखो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बंगालमध्ये तीन तर ओडिसामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बंगामधील जवळपास एक कोटी लोक प्रभावित झाली आहेत.
पावसामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या पाच राज्यांमध्ये एनआरएफच्या ११३ पथकातील जवानांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
ओडिसामधील ५.८ लाख लोक तर बंगालमधील १५ लाख लोकांना आश्रय शिबिरांवर पोहोचविण्यात आले आहे. ओडिसामधील चांदीपूर आणि बालासोर तर बंगालमधील दक्षिण परगना जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. चक्रीवादळामुळे १४५ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वादळी वारे वाहात होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, तसेच शेतांमध्ये पाणी शिरले आहे.









