मुंबई – शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर आता त्यांच्या व्यवहाराची तपासणी करण्यात येत आहे. त्यात एका डायरीमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. त्यात मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिल्याचाही या डायरीत उल्लेख आहे. दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर जाधव यांनी त्याबाबत लगेच खुलासा करुन डायरीतील मातोश्री म्हणजे, आपल्या आई असल्याचा दावा केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. त्यात जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचेही म्हटले होते. त्यानंतर आयकर विभागाने छापेमारी केली. त्यात आता या डायरीतील नोंदी समोर आल्यामुळे पुन्हा आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहे. मातोश्रीच्या उल्लेखांमुळे भाजप नेत्यांना आयतेच हत्यार मिळाले असून त्यावरुन त्यांनी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे.