फलटण – महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांच्या समृत्यर्थ येथे २५ नोव्हेंबरला होणाऱ्या नवव्या यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय चोरमारे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची फलटण शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि श्री सद्गुरू प्रतिष्ठान यांच्यावतीने संयुक्तपणे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध पटकथालेखक प्रताप गंगावणे आणि ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात सकाळी साडेदहा वाजता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री आशाताई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून सूत्रसंचालन ताराचंद आवळे करणार आहेत. त्यानंतर रवींद्र कोकरे आणि ज. तु. गार्डे यांचे कथाकथन होईल.