निष्पाप निरागस जीवांची सेवा करण्याची संधी मिळणे भाग्याचेः सचिन पाटील
नाशिक – चुक नसतानाही आयुष्य उध्वस्त होण्याचा शाप भोगणाऱ्या निष्पाप निरागस जीवनात हास्य फुलविण्यासारखे पुण्य प्राप्त करण्यासाठी देखील भाग्य लाभते. गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्र पातळीवर एडस् सहजीवन जगणाऱ्या निष्पाप जीवांचे पुनर्सन करणाऱ्या यश फाऊंडेशन ही संस्था या लौकिकार्थाने परम भाग्यशाली आहे असे गौरवोद्गार नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी काढले. यश फाऊंडेशनतर्फे आयोजीत दिवाळी स्नेह फराळ कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकाश पर्वाचा उत्साह सर्वदूर ओसंडून वाहत असतांना समाजाचे काही घटक अशा नैसर्गीक आनंदापासून पारखा होतो.अशा घटकांपैकी एक घटक स्वतःची कुठलीही चुक नसतांना आपल्या आयुष्य अंधारात चाचपडत कंठीत आहे.कुटूंबातील कुणाच्या तरी घोडचुकीमुळे आयुष्य उध्वस्त होऊन समाजाच्या अडगळीत पडलेले अनेक निष्पाप जीव नशीबाशी झगडत आहेत.कुणाला आई नाही कुणाला बाप नाही तर कुणी मातापित्याशिवाय आजी किंवा आजोबांच्या छत्राखाली जगत आहे.काहींतर एकदम निराधार.रोजच्या घासाची मारामार,त्यांच्या आयुष्यात दीपोत्सवाचा प्रकाश कुठून चमकणार? अशा १ते २१ वर्ष वयोगटातील तब्बल १२५ निरागस जीवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून रविंद्र पाटील या उच्च शिक्षीत अवलियाने यश फाऊंडेशनची स्थापना करून महिंद्रा कंपनींच्या बहुमोल सहकार्याने गेल्या पंधरा वर्षांपासून चळवळ सुरू केली आहे.रविंद्र पाटील हे एमएसडब्लू,एमबीएसह कायद्याचे पदवीधर असूनही सामाजिक बांधिलकी म्हणून या कार्यात सेवारत आहेत.यश फाऊंडेशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही या निष्पाप निरागस पिढीच्या आयुष्यात दीपावलीच्या आनंदाचा प्रकाश पडावा म्हणून स्नेह फराळाचे आयोजन करण्यात आले होते.कर्मसंयोगाने या आनंदोत्सवाला पाहूणे म्हणून त्यांच्यासारखेच सामाजिक ऋणांची जाण असलेले पो.अधिक्षक सचिन पाटील यांचा सहवास लाभला.सचिन पाटील यांनी एडस् सहजीवन जगणारी मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला.प्रत्येक पाऊल टाकतांना आत्मविश्वास दृढ ठेवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.संकटांवर मात करण्याचे कसब अंगी बाणण्याचे सुत्र आणि मंत्रही सांगीतला.पोलीस अधिक्षकांशी संवाद साधत असतांना निष्पाप चेहऱ्यावर जीवन सार्थकी करून दाखविण्याचे भाव चमकत होते.आयपीएस आयएएस अशा उच्च पदावर जाण्याचे स्वप्न नजरेतून डोकावत होते.
उपेक्षीतांच्या जीवनाला प्रकाश
“जन्म मृत्यु आपल्या हातात नाही.मात्र कसे जगायचे हे आपण ठरवू शकतो.कुणा दुसऱ्याची चुक आपल्या आयुष्याची धुळधाण करून गेली असेल तरीही पुन्हा उभारी घेऊन जगता येते.हा नवा धडा या निष्पाप जीवांच्या अल्प सहवासातून मिळाला.अशा खऱ्या उपेक्षीतांच्या जीवनाला प्रकाश दाखवण्याचे काम सर्वश्रेष्ठ मानायला हवे.”
– सचिन पाटील, पो.अधिक्षक,नाशिक
आत्मविश्वास या स्नेह मिलनाचे खरे यश
पंधरा वर्षापासून यश फाऊंडेशनचे हे काम सुरू आहे.हे काम करतांना मिळणारे समाधान करोडोच्या संपत्तीपेक्षाही मोठे आहे.पो.अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी संवाद साधतांना या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव त्यांची भेट सार्थ ठरविणारे होते.आपणही अशा मोठ्या पदावर जावे,हा त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास या स्नेह मिलनाचे खरे यश आहे.
– रविंद्र पाटील, संस्थापक,यश फाऊंडेशन.नाशिक