मुंबई – देशातील आघाडीची वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या ग्राहकांना आणखी एक खास भेट दिली आहे. अलीकडेच महिंद्राच्या नव्या सेव्हन सीटर एसयूव्ही XUV700 चे लॉन्चिंग केले आहे. या गाडीने मार्केटमध्ये चांगलाचा माहोल तयार केला आहे. अनेक नव्या अॅडव्हान्स फिचर्समुळे या सेगमेंटमध्ये गाडीची विशेष चर्चा आहे. कंपनीने या गाडीत Alexa Voice आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम दिली आहे. अशी सेवा देणारी देशातील ही पहिलीच गाडी आहे. केवळ आवाजाच्या जोरावर या गाडीतील खिडक्या, सनरूफ, इन्फोमेंट सिस्टीम, म्युझिक सिस्टीम, कॅबीनचे तापमान आदी गोष्टी कंट्रोल करता येतात. घरात बसून एलेक्साला ऑर्डर दिल्यासारखा फील या गाडीत येतो. त्यामुळे चालक निश्चिंत होऊन ड्रायव्हींग करू शकतो, हे महत्त्वाचे. स्टीअरिंग व्हीलवरून लक्ष विचलीत न होऊ देता केवळ आवाजाच्या जोरावर बाकी सर्व गोष्टी नियंत्रीत करता येतात. व्हॉईस कमांड यापूर्वीही काही गाड्यांनी दिले आहे, मात्र एलेक्सा प्रथमच उपलब्ध झाली आहे. अमेझॉनने असा दावा केला आहे की लोकांना घरात जो आवाज ऐकायला आवडतो तोच आवाज गाडीत ऐकायला आवडतो. त्यामुळे महिंद्राने या नव्या सिस्टीमवर आनंद व्यक्त केला आहे. गाडी चालविताना एक वेगळा आनंद चालकाला मिळेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. झिरो इंटरनेट असलेल्या भागातही एलेक्सा सेवेत असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या एसयूव्हीमध्ये अत्याधुनिक फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यात अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मोठा टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आले आहे.