कसोटी विश्वविजेता
इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया अशा दोन तुल्यबळ आणि तगड्या प्रतिस्पर्धी संघांत २०२१-२३ या काळासाठी असलेली कसोटी विश्वविजेते पदासाठी अंतिम लढत आज सुरु होत आहे. भारत दुसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या- वहिल्या लढतीत इंग्लंडमध्येच लॉर्ड्सवर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताला अनपेक्षितरित्या पराभूत करुन पहिले कसोटी विश्वविजेतेपद मिळविले होते. त्यावेळी इंग्लंडमधील ढगाळ आणि पावसाळी हवेत भारताने दोनच जलदगती गोलंदाज खेळवून दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा डाव कोहलीच्या भारतीय संघाच्या अंगलट आला !
आता यावेळी भारताने ती चूक पुन्हा करायला नको . हा सामना ओव्हलवर आहे जेथे फिरकी गोलंदाज चालतात ( आठवा १९७१ चा अजित वाडेकरच्या संघाचा ऐतिहासिक विजय ज्यात Mystery स्पिनर चंद्राने ( भागवत चंद्रशेखर ) ३८ धावात इंग्लंडचे सहा मोहरे बाद केले होते ). तथापि यावेळी मुख्य फरक असा आहे की सामना जून मध्ये आहे . ओव्हलवर सामने नेहमी सप्टेंबरमध्ये असत्तात जेंव्हा पाऊस संपलेला असतो .
याच मुळे भारताचा ११ खेळाडूं च्या निवडीचा घोळ सामना सुरु व्ह्ययला काही तासच उरलेले असूनही मिटला नाही . याउलट ऑस्ट्रेलियाने त्याच्या ११ खेळाडूचा संघ जाहीर केला देखील तोही २४ तास आधी ! जिंकण्या हरण्याचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड आहे तर भारत हा बेभरवशाचा असल्याने काही भाकीत वर्तविता येत नाही ! फॉर्म, अनुभव आणि गुणवत्ता हे निकष लावले तर भारत सरस आहे तरीही ! इतका मह्त्त्वाचा आणि ऐतिहासिक सामना असूनही क्रिकेटप्रेमीमध्ये या सामन्याची चर्चा देखील नाही आणि उत्सुकताही ! यापेक्षा आय पी एल च्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यांबद्दल जास्त बोलले आणि लिहिले गेले !
क्रिकेट जगतात तर चर्चा देखील नाही . जेथे हा महत्त्वाचा सामना होत आहे त्या इंग्लंडमध्ये तर जून १६ पासुव सुरु होणाऱ्या ॲशेसची जास्त चर्चा आणि उत्सुकता आहे ! आय सी सी म्हणजे जागतिक क्रिकेट संघटनेला या स्पर्धेत अधिक जान आणण्यासाठी आणि खेळणाऱ्या इतर सर्व देशाना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत हे निश्चित. पण ही स्पर्धा बंद होऊ नये कारण प्रत्येक कसोटी सामन्याला याच स्पर्धेने काही महत्त्व आणि संदर्भ दीला आहे हे लक्षात घेतले पाहिजे ! भारताने गेल्या दशकातील एकही विश्वचषक जिंकलेला नाही (२०११ साला नंतर ). आता ती उणीव दूर करायची सुवर्णसंधी आली आहे पाहू या रोहित शर्माचा भारतीय संघ ही अपेक्षा पुरी करतो का? या सामन्याच्या निमित्ताने कसोटीचे महत्त्व अधोरेखित व्हावे.
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
WTC World Test Championship India Australia