मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता, असे विधान करून वाद ओढवून घेणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांचे औरंगजेब प्रेम आता पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने भोईवाडा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू असल्याचा आरोप भाजपने केला. काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटसवर ठेवून धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून एक नवा वाद ओढवून घेतला होता. कोल्हापूर व औरंगाबादमध्ये दंगलसदृष्य परिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगली जुंपली होती. आता सध्या तरी हे वातावरण शांत असताना भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी पेशवे, औरंगजेब आणि ब्राह्मणांविषयी काही मते मांडली. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
भाजपच्या कायदेशीर सल्लागार विभागाने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र भाजपाचे सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड. अशुतोष दुबे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. भालचंद्र नेमाडे या लेखकाविरोधात मी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमाडे यांनी हिंदू ब्राह्मणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणी हस्तक्षेप करणारं आणि जनतेला चिथावणी देणारं भाषण केलं आहे. या विधानातून त्यांनी सार्वजनिक सलोखा बिघडवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दुबे यांनी केली आहे.
काय म्हणाले नेमाडे?
औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. तुम्हाला माहीत आहे की, शाहजानची आईही हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी-विश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. छावणीतले लोकही म्हणाले, दोन्ही राण्या कुठे गेल्या, ते आम्हाला माहीत नाही. तेव्हा औरंगजेबाला समजलं की काशी विश्वेश्वर मंदिरातील जे पंडे होते, ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. बायकांना भ्रष्ट करणारे पंडे हिंदू होते का?, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण देताना केला.
writer bhalchandra nemade controversial statement aurangzeb
marathi literature history dnyanpeeth awardee books bjp police