टोकियो (जपान) – ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इराणच्या मोर्तेजा घियासीला चीतपट केले आहे. पुनियाच्या या जबरदस्त खेळाने भारतीयांची मने जिंकली असून सर्वांच्या नजरा आता उपांत्य फेरीकडे लागल्या आहेत.
सामन्याच्या सुरुवातीलाच घियासीने सामन्यात आघाडी घेतली होती. परंतु बजरंग पुनियाने शेवटच्या काही क्षणात जिगरबाज खेळी करत घियासीला लोळवले. मोर्तेजाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहियाने रौप्यपदकावर नाव कोरल्यानंतर सर्वांच्या नजरा बजरंग पुनिया आणि सीमा बिस्लाकडे लागल्या होत्या. मात्र सीमा बिस्लाचा पराभव झाला. परंतु बजरंगने उत्कृष्ट कामगिरी करत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या आधीच्या सामन्यात बजरंगने उपउपांत्य सामन्यात किर्गिस्तानच्या अकमाचालिव्हचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.