विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
छत्रसाल स्टेडिअमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे व माहिती समोर येत आहे. आता ऑलिम्पियन सुशील कुमारबद्दल आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. एकेकाळी सुशील कुमार यांना आपला गुरू मानणार्या सागर याने उघडपणे सुशीलकुमारचा छळ सुरू केला. मॉडेल टाऊनच्या एम-२ ब्लॉकमध्ये असलेल्या त्याच्या फ्लॅटमुळे दोघांमध्ये कटुता वाढली होती, त्यामुळे पुढे संपूर्ण हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, पहिलवान सुशीलचा प्रथम संबंध गुन्हेगार संदीप उर्फ काला जठेडी आणि लॉरेन्स विश्नोई यांच्याशी आला. सुशीलने खंडणीच्या प्रकरणात खंडणीखोर आणि पीडित यांच्यात मध्यस्थी करण्यास सुरुवात केली होती. मॉडेल टाऊनमधील वादग्रस्त फ्लॅटसुद्धा सुशीलसह काला जठेडी यांनी दोन व्यावसायिकांकडून खरेदी केला. या फ्लॅटमध्ये काला जठेडींचा देखील वाटा होता. मात्र सुशीलला एकट्याने फ्लॅट ताब्यात घ्यायचा होता. या कारणास्तव त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी सागर आणि सोनू महालला जबरदस्तीने फ्लॅटमधून काढले. पुढे हा वाद वाढताच सागरने कुस्तीपटू सुशीलला उघडपणे शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सुशीलकुमारला हे सहन होत नव्हते.
दुसरीकडे, जठेडी याचे निकटवर्तीय आणि या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी असलेला सोनू महाल सुशीलचा अगदी जवळचा होता. याच सोनूवर अनेक गुन्हे दाखल आहेत. ४ मेच्या रात्री म्हणजेच घटनेच्या दिवशी सागरला धडा शिकवण्याच्या उद्देशाने सुशीलने मित्रांना एकत्र केले. त्यासाठी नीरज बावनियाच्या टोळक्यालाही घटनास्थळी बोलावले. रात्री उशिरापर्यंत सर्वजण अनेक वाहनांवर चढून मॉडेल टाऊनच्या फ्लॅटवर पोहोचले.
सोनूने सागरची बाजू घेतली. त्यामुळे सुशील आणि त्याच्या साथीदारांनी सोनूला जोरदार मारहाण केली. तिकडे दुबईमध्ये घटनेची माहिती मिळताच काला जठेडी संतप्त झाला. तर इकडे सुशीलला हे माहित होते की, जठेडी त्यांना सोडणार नाही. मात्र ५ मे रोजी फरार होताना सुशीलने जठेडी याच्याकडे संपर्क साधला आणि हा खटला नव्याने दाखल व्हावा, अशी विनवणी केली. सोनूला आपल्याविरूद्ध काही बोलू देऊ नका अशी विनंती केली.
पण जठेडी याने सुशीलवर नाराजी व्यक्त केली आणि त्याला मारण्याची धमकी दिली. फरार होताना सुशीलने काला जठेडीच्या जवळच्या नातेवाईकांशीही संपर्क साधला आणि या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली. आता पोलिसांव्यतिरिक्त सुशीलला काला जठेडीकडूनही धमकी देण्यात आली आहे. आता सुशीलला वाटते की, तुरूंगात गेल्यावर त्याच्यावर कोणताही हल्ला होऊ नये. तसेच या तपासादरम्यान पोलिसांना समजले आहे की, सागरच्या हत्येनंतर सदनिकेच्या भाडेतत्त्वावर सातत्याने चर्चा होत होती, परंतु फ्लॅट ताब्यात घेऊन त्याला धडा शिकवणे हे सागरच्या हत्येचे कारण होते.