टोकियो – ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची आशा बाळगल्या जाणार्या कुस्ती स्पर्धेत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ५७ किलो वजनीगटाच्या अंतिम सामन्यात रशियाच्या झाउर गुउएव्हने भारताच्या रवीकुमार दहियाला ७-४ असे चीतपट करून लढत जिंकली. तर ८६ किलोवजनीगटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत दीपक पुनियाचाही पराभव झाला आहे. अखेरच्या दहा सेकंदात त्याला सॅन मरिनो या देशाच्या मायलीस अॅमिने याने त्याला ३-२ असे पराभूत केले.
रवीकुमारने उपांत्यफेरीत कझाकिस्तानच्या सनायेव्ह नूरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कुस्तीमध्ये सुशील कुमारने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आतापर्यंत भारताने कुस्तीमध्ये पाच पदके जिंकली आहेत. योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये कांस्य, २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकले होते.
विनेश फोगाटकडूनही निराशा
भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी जर्मनीचा पराभव करून दिवसाची सुरुवात चांगली केल्यानंतर भारताला महिला कुस्ती स्पर्धेत निराश व्हावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगाटचा बेलारुसच्या कुस्तीपटूने ९-३ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कुस्तीमध्ये पदक मिळविण्याच्या भारताच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. विनेशने फ्री स्टाइलमध्ये पहिल्या स्थानावर असलेली विनेशकडून पदकाची अपेक्षा होती. विनेशला अजून कास्य पदक जिंकण्याची संधी आहे.