नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या कुस्तीपटूंचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध पुकारलेले आंदोलन आता चिघळू लागले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी मध्यरात्री कुस्तीपटूंशी चर्चा केल्याची माहिती आहे. परिणामत: या आंदोलनाचा शेवट होणार की कुस्तीपटूंनी केलेल्या घोषणेप्रमाणे पदक वापसी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी शारीरिक-मानसिक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे खेळाडूंनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे त्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नवीन संसदेच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी अक्षरश: या खेळाडूंना फरफटत नेत आंदोलनास्थळावरून उचलण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांच्या त्या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातील विविध घटकांनी निषेध नोंदविला होता. दरम्यान, १९८३च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजेत्या संघाने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वातील विश्वविजेत्या संघाच्या पाठींब्याने आंदोलनाला बळ मिळाले आहे. या सर्व घडामोडी होत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुस्तीपटूंशी चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिक माहिती देण्यास नकार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकांच्या शिष्टमंडळाने काल मध्यरात्री चर्चा केली. दोन तास चाललेल्या या बैठकीत नेमके काय झाले, हे सांगण्यास खेळाडूंनी नकार दिला. ‘आमची केंद्रीय गृहमंत्र्यांशी बैठक झाली. याहून जास्त माहिती मी देऊ शकत नाही,’ असे पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला.
Wrestler Protest Home Minister Amit Shah Meet