विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनातून बरे झालेल्या लोकांना काळी बुरशीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. डोळे, नाक, मेंदू पर्यंत हा आजार पोहोचून अवयव निकामी करत आहे. स्टेरॉइड न घेताही काळी बुरशीचा संसर्ग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाने दोन रुग्णांचा दाखला देत याबाबत माहिती दिली. दोन्ही रुग्ण मधुमेहग्रस्त होते. परंतु त्यापैकी एकाने स्टेरॉइडयुक्त औषधाचे सेवन केले होते.
दोन्ही रुग्णांना पोटात सौम्य प्रमाणात दुखत होते. प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एक रुग्ण खूपच गंभीर झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
पोटदुखीची लक्षणे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, काळी बुरशी पोटातील छोट्या आतड्यांपर्यंत पोहोचू शकते. सिटी स्कॅन किंवा बायोप्सीद्वारे याचे निदान करता येऊ शकते. वरील दोन्ही रुग्णांची बायोप्सी केल्यानंतरच काळी बुरशी झाल्याचे निदान झाले होते. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या चेह-यावर सूज येणे, दातदुखी, डोकेदुखी ही काळ्या बुरशीची लक्षणे मानली जात होती. पण आता यामध्ये पोटदुखी या लक्षणाचाही समावेश झाला आहे.
गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. उषास्त धीर सांगतात, दिल्लीतील रहिवासी ५६ वर्षीय कुमार यांच्या कुटुंबात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर ते स्वतः कोरोनाबाधित झाले. यादरम्यान त्यांना पोटदुखी आणि पीत्त होऊ लागले. त्यावर त्यांनी घरीच औषधे घेतली. पण नंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली.
रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात पोहोचल्यानंतर सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या छोट्या आतड्याला छिद्र आढळले. तोपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉ. धीर यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या आतड्याच्या पहिल्या भागात अल्सर दिसल्यानंतर त्यांना शंका आली. त्यांनी त्वरित बुरशीविरोधी उपचार सुरू केले. शस्त्रक्रियेद्वारे आतड्याच्या छोट्या भागाला बायोप्सीसाठी पाठविले. त्याचा अहवाल आश्चर्यचकित करणारा होता.
असेच एक प्रकरण रुग्णालयातील डॉ. पीयूष रंजन यांच्याकडे आले. सर्व कुटुंब कोरोनातून बरे झाल्याने ६० वर्षीय एजाज खूप आनंदी होते. परंतु त्यांच्या पोटात थोडे दुखू लागले. मधुमेहग्रस्त झाल्यासोबतच त्यांनी स्टेरॉइडही घेतले होते. त्यांना ताप आणि खूप कमी वेदना होत्या. सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या आतड्यांमध्ये काळ्या बुरशीचे निदान झाले. त्यानंतर बायोप्सीमध्ये आणखी एक दुजोरा मिळाला. दोन्ही रुग्ण मधुमेहग्रस्त होते. त्यापैकी एकानेच स्टरॉइड घेतले होते. त्यामुळे स्टेरॉइडमुळेच काळी बुरशी होऊ शकते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे डॉक्टर म्हणाले.