इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील कोणतीही शाळा असो ते विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे केंद्र तथा ज्ञान मंदिर असते. सहाजिकच शाळा अत्यंत सुंदर, सुशोभित, स्वच्छ तर असावी. परंतु त्यामध्ये विद्यादानाचे तथा ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक देखील अत्यंत हुशार आणि तळमळीचे हवेत. त्याचप्रमाणे ज्ञान ग्रहण करणारे विद्यार्थीही चांगले हवेत. तरच त्या शाळेच्या इमारतीला महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते.
भारतात अनेक राज्यांमध्ये काही खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा असो की, शासकीय शाळा अत्यंत नामांकित आणि नावाजलेल्या आहेत, त्याचप्रमाणे जगात देखील अशा नामांकित शाळा असून यामध्ये भारतीय शाळांचा काही भारतीय शाळांचा समावेश होतो आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणावी लागेल
यूकेमध्ये प्रथमच देण्यात येणाऱ्या ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल्स’ पुरस्कारांच्या टॉप 10 यादीत पाच भारतीय शाळांचा समावेश करण्यात आला आहे. समाजाच्या प्रगतीच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ब्रिटनमध्ये 2.5 दशलक्ष डॉलर्सचे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत नवी दिल्लीच्या लाजपत नगरमधील SDMC प्राथमिक शाळेचाही समावेश करण्यात आला आहे.
जगातील टॉप 10 शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये, नवी दिल्लीतील शाळेव्यतिरिक्त, मुंबईतील SKVM संस्थेच्या च्या CNM शाळेची देखील ‘इनोव्हेशनसाठी जागतिक सर्वोत्तम शाळा पारितोषिक’ श्रेणीतील टॉप-10 यादीसाठी निवड झाली आहे. याशिवाय मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्यातील बोपखेल येथील पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूलचा ‘कम्युनिटी सपोर्ट’ श्रेणीतील टॉप 10 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
तसेच कोलकता हावडा येथील समॅरिटन मिशन हायस्कूलला जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीत ‘विपत्तीवर मात करणे’ या श्रेणीत स्थान मिळाले आहे. या संदर्भात T4 एज्युकेशनचे संस्थापक आणि ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार प्राप्त विकास पोटा म्हणाले की, कोविडमुळे शाळा आणि विद्यापीठे बंद झाल्यामुळे 1.5 अब्जाहून अधिक विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. पद्धतशीर बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आम्ही तळागाळात उपाय तयार करण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारांची स्थापना केली आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणा आणि परिवर्तन घडवणाऱ्या शाळांची कथा सांगून शिक्षणाचा कायापालट होऊ शकतो. अंतिम विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाईल. यूके आधारित डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म T4 एज्युकेशनने जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार सुरू केले आहेत. संबंधित श्रेणीतील अंतिम विजेते या वर्षी ऑक्टोबरमध्ये घोषित केले जातील. 2.5 दशलक्ष डॉलर्सची रक्कम पाच विजेत्यांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल आणि प्रत्येक विजेत्याला 50 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळेल.