वॉशिंग्टन – एखाद्या गुन्हेगार किंवा ड्रग माफियाची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून देणाऱ्याला किती रुपयांचे बक्षीस असू शकते? १ लाख, १० लाख किंवा फार फार तर ५० लाख. पण, तब्बल ४३ कोटींचे बक्षीस जाहीर असेल तर? हो, हे खरे आहे. कारण, तो गुन्हेगारही तेवढा कुख्यात आहे. डायरो अँटोनियो युसुगा असे त्याचे नाव आहे. आणि तो आहे जगातील सर्वात कुख्यात ड्रग माफिया. जगभरातील ड्रग तस्करीच्या टोळीचा तो म्होरक्या आहे. आणि चक्क तो आता जेरबंद झाला आहे.
कोलंबियातील मोस्ट वॉन्टेड पैकी एक आणि देशातील मोठ्या ड्रग स्मगलिंग टोळीचा भयानक खतरनाक म्होरक्या डायरो अँटोनियो युसुगा ऊर्फ ओटोनिअल याला तेथील लष्करी दलाने अखेर अटक केली आहे. कोलंबियाचे राष्ट्रपती इव्हान ड्यूक यांनी ही माहिती दिली. राष्ट्रपती इव्हान ड्यूक हे या देशातील दहशतवादी हिंसाचार रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. कोलंबियाने युसुगाबद्दल माहितीसाठी 8 दशलक्ष (सुमारे 6 कोटी) आणि पकडून दिल्यास 5 दशलक्ष (सुमारे 37 कोटी) असे एकूण 43 कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.
युसुगा (वय 50) हा कोलंबियन हिंसक मादक पदार्थांची तस्करी करणारी टोळी ‘क्लॅन डेल गॉल्फो’ चा कथित नेता आहे. त्याचा शोधात लष्कर आणि पोलिस दोघेही आहेत. त्याची ही टोळी कोकेनच्या तस्करीसाठी अमेरिकेलाही लक्ष्य करत आहे. राष्ट्राध्यक्ष ड्यूक यांनी युसुगाचे वर्णन जगातील सर्वात भयानक ड्रग तस्कर म्हणून केले आहे. युसुगा हा अनेक पोलीस अधिकारी, सैनिक आणि राजकारण्यांच्या हत्येसाठी दोषी असल्याचे ड्यूक यांनी सांगितले आहे.
राष्ट्राला संबोधित करताना ड्युक म्हणाले की, ‘या शतकातील अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देण्यासाठी आपल्या देशातला हा सर्वात कठीण काळ आहे. त्याची तुलना फक्त 1990 मध्ये पाब्लो एस्कोबारच्या पतनाशी केली जाऊ शकते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, युसुगाला दुर्गम पर्वतांवरून अटक करण्यात आली. मात्र या कारवाईत एक 34 वर्षीय अधिकारी मारला गेला. यूएस स्टेट पोलीस डिपार्टमेंटने त्याचे वर्णन एका सशस्त्र आणि अत्यंत हिंसक टोळीचा नेता म्हणून केले असून यात दहशतवादी गटाचे सदस्य आहेत.
पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार, क्लॅन डेल गोल्फो मादक पदार्थांच्या तस्करीचे मार्ग, कोकेन प्रक्रिया प्रयोगशाळा आणि गुप्त हवाई पट्टी नियंत्रित करण्यासाठी हिंसाचार आणि धमकीचा वापर करत असे. याबाबत कोलंबियाचे संरक्षण मंत्री डिएगो मोलानो म्हणाले की, अलिकडच्या काही वर्षांत ही टोळी समाजासाठी एक धोका बनली आहे. कारण या टोळीने केवळ देशातच नव्हे तर अमेरिका आणि युरोपमध्ये टन कोकेनचे वितरण केले होते.
कोलंबियाच्या अँटिओक्विया प्रांतात त्याच्या अटकेसाठी कोलंबियाच्या विशेष दलाचे 500 सैनिक आणि 22 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. देशातील 32 पैकी 12 प्रांतांमध्ये त्याच्या टोळीचे अस्तित्व असून त्याचे सुमारे 3,800 सदस्य आहेत. तसेच कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युसुगाची टोळी दरवर्षी सुमारे 200 टन कोकेनची तस्करी करते आणि 200 हून अधिक कोलंबियन सुरक्षा दलांच्या मृत्यूसाठी ते जबाबदार आहे.
https://twitter.com/instablog9ja/status/1452209335912763399