इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग २०
अतिशय विशाल आणि देखणे
टोरंटोचे श्रीस्वामीनारायण मंदिर
(क्षेत्रफळ ७२,८४३ चौफुट)
जगातील सर्वांत मोठे मंदिर या ‘इंडिया दर्पण’च्या विशेष लेखमालेत आज आपण ऑस्ट्रेलियातील टोरंटो येथील बीएपीएस श्रीस्वामीनारायण या मंदिराचा परिचय करून घेणार आहोत.
बीएपीएस म्हणजे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण ही धार्मिक आणि अध्यात्मिक संस्था जगप्रसिद्ध आहे.या संस्थेने प्रमुख स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स. १९७१ पासून आजपर्यंत संपूर्ण जगात १५० शिखरबद्ध मंदिरं बांधली आहेत.त्यांनी आजवर जगभर बांधलेल्या मंदिरांची संख्या १७०० पेक्षा अधिक आहे. आज आपण टोरंटो येथील ज्या श्री स्वामीनारायण मंदिराचा परिचय करून घेत आहोत त्या शिखरबद्ध मंदिराचे २२ जुलै २००७ रोजी लोकार्पण करण्यात आले.
बीएपीएसची जगभरातील अक्षरधाम किंवा स्वामीनारायण मंदिरं एकापेक्षा एक देखणी आहेत. टोरंटो येथील मंदिराचा देखील याला अपवाद नाही.ऑस्ट्रेलियातील एटबिकॉक, टोरंटो, ओंटयारियो म्हणजे टोरंटो विमानतळाच्या परिसरात हे मंदिर बांधलेले आहे. सुमारे नऊ एकर जागेवर असलेले हे मंदिर इटालियन करार मार्बल, तुर्किश लाइमस्टोन आणि इंडियन पिंक स्टोन पासून केवळ१८ महिन्याच्या विक्रमी कालावधीत बांधण्यात आले आहे. कुशल भारतीय कारागिरांनी अत्यंत कुशलतेने घडविलेले मंदिराचे 24,००० भाग एकत्र जोडून जगातले हे भव्य आणि सुंदर मंदिर तयार करण्यात आले आहे.
हिंदू वास्तुशास्त्रानुसार अत्यंत काटेकोरपणे तयार करण्यात आलेले अशा प्रकारचे हे मंदिर कॅनडातील सर्वांत भव्य मंदिर आहे. मंदिरा भोवती १८ एकर जागेवर सुंदर गार्डन आणि वेलबिल्ट मैदान विकसितकरण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे केवळ येथेच भारतीय पद्धतीची पारंपरिक हवेली आणि भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि तत्वज्ञान यांची ओळख करून देणारे म्युझियम देखील आहे.
वंडरफुल आर्किटेक्चर
मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मंदिराच्या भिंती, खांब, छत, घुमट अत्यंत कलाकुसरयुक्त आहेत. मंदिरातील आणि मंदिरावरिल प्रत्येक मूर्ती आणि प्रतिमा भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. सुर्यप्रकाशांत हे मंदिर एखाद्या क्रिस्टल पैलेस प्रमाणे चमकते. या मंदिराचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी २४००० रॉ मटेरियल म्हणजे दगड भारतात बोटीने भारतात पाठविण्यात आले. राजस्थानातील कुशल करागिरांनी आपल्या कुशल हातांनी मंदिराचे २४००० पार्ट्स घडविले. या सर्व पार्ट्सना क्रमांक देण्यात आले. भारतातून हे सर्व पार्ट्स पुन्हा टोरंटो येथे पाठविण्यात आले.येथे सुमारे ४०० तज्ञ करागिरांनी हे सगळे २४००० पार्ट्स एकमेकांना जोडून जगातले हे अतिशय सुंदर देखणे मंदिर उभारले. प्राचीन भारतीय वैदिक शैली नुसार या मंदिरांत आले आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरचे घुमट ४३४ पार्ट्स जुळवून तयार करण्यात आले आहे. हे शिखरबद्ध मंदिर हिंदू शिल्पशास्त्रानुसार घडविण्यात आले आहे. मंदिरांत अनेक लहान लहान मंदिरं आहेत. मंदिराच्या केंद्र स्थानी स्वामीनारायण आणि डावीकडे स्वामी गुणातीतानंद यांच्या अतिशय आकर्षक प्रतिमा आहेत. त्याच प्रमाणे मंदिरांत राधा-कृष्ण, सीता-राम, शिव-पार्वती, विष्णु-लक्ष्मी, तसेच हनुमान व गणेश यांच्या अतिशय आकर्षक आणि देखण्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.
मंदिराच्या जवळ इतर कुठेही न दिसणारी पारंपरिक भारतीय हवेली पहायला मिळते. खरं तर हे या मंदिराचे एक वैशिष्ट्ये मानले जाते. भारतीय वास्तुशास्त्राची सर्व वैशिष्ट्ये या हवेलीत पहायला मिळतात. या हवेली साठी सागवान आणि रोजवुड लाकुड वापरण्यात आले आहे. हवेलीच्या भिंती आणि खांबांवर भारतीय पौराणिक कथा तसेच सूर्य,चन्द्र, हंस,मोर सिंह आदि प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे.
येथील सांस्कृतिक केन्द्रांत लहान मुलांपासून तरुण व वयस्कर मंडळींसाठी धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक वर्ग आयोजित केले जातात. तरुणांसाठी करिअर डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
तसेच तरुणाईसाठी फुल साईज जिमन्याशियम असून विविध प्रकारच्या स्पोर्ट्स अॅक्टीव्हीटीज नियमितपणे आयोजित केल्या जातात. मंदिराच्या परिसरात फूड शॉपमध्ये व्हेजिटेरियन स्नैक्स मिळतात. मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांचे साठी क्वार्टर्स आहेत.
हेरिटेज म्युझियम मध्ये हिंदू धर्माचे प्रदर्शन मांडलेले आहे. यातून हिंदू धर्मातील मुलभूत संकल्पना , हिंदू धर्माचा उदय आणि आजच्या काळात त्याची आवश्यकता यांची माहिती मिळते. या मंदिराच्या बांधकामाचा इतिहास मनोरंजक आहे. २३ जुलै २००० रोजी प्रमुख स्वामी महाराज यांचे हस्ते मंदिराचा शिलान्यास करण्यात आला. १८ जुलै २००४ रोजी हवेलीचे उद्घाटन झाले. यावेळी विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मंदिराचे लोकार्पण २२ जुलै २००७ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख स्वामी महाराज तसेच कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टिफन हार्पर, ओंत्यारियोचे प्रीमियर डाल्टन मॅक ग्युनिटी आणि टोरंटोचे मेअर डेव्हिड मिलर उपस्थित होते. याप्रसंगी तीन दिवस विविध प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे हे भव्य आणि देखने मंदिर बांधण्यासाठी ४० मिलियन डॉलर खर्च आला आणि ही सर्व रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात आली.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Toronto Swaminarayan Temple by Vijay Golesar