इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १०
संपूर्ण ग्रेनाईट मध्ये बनविलेले
जगातील एकमेव
तंजावूरचे बृहदेश्वर मंदिर
( क्षेत्रफळ १,०२,००० स्क्वेअर फूट)
जगातील सर्वांत मोठी मंदिरं या इंडिया दर्पण च्या विशेष लेख मालेत माहिती घेतांना अशी काही आश्चर्ये पहायला मिळतात की मानवी बुद्धि अक्षरश: गुंग होते. आज आपण तामिळनाडूतील तंजावुर येथील ज्या बृहदेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत ते मंदिर म्हणजे पाया पासून कळसापर्यन्त किंवा कळसापासून पाया पर्यन्त आश्चर्यच आश्चर्य आहेत.
स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे तंजावरचे बृहदेश्र्वर मंदिर. प्राचीन भारतीय स्थापत्यकला खरोखरच अद्भुत होती. याची साक्ष देणारे मंदिर म्हणजे बृहदेश्वर मंदिर. हे विशाल मंदिर आणि त्याची अदभुत शिल्पे यावरून आपली संस्कृती,आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याची कल्पना येते. आपल्या पुर्वजांचे कर्तुत्वपाहून मन अभिमानाने भरून येते. आपल्या अद्भुत स्थापत्यशास्त्रामुळे युनेस्कोने 1987 साली या मंदिराची जागतिक वारशा स्थळांच्या यादीत नोंद केली आहे.
मंत्रमुग्ध करणारी शिल्पकला
बृहदेश्र्वर हे मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथे आहे. कावेरी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर आजही मोठ्या दिमाखात आणि मुख्य म्हणजे सुस्थितीत उभे आहे. भारतातील सर्वांत मोठ्या मंदिरांत समावेश असलेल्या बृहदेश्र्वर मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला मंत्रमुग्ध करणारी आहे.
१ लाख ३० हजार टन ग्रेनाईट
जगातले हे एकमेव मंदिर संपूर्णपणे ग्रेनाईट दगडांत निर्माण करण्यात आले आहे. या मंदिरासाठी १,३०,००० टनापेक्षा जास्त ग्रेनाईट वापरण्यात आला. ग्रेनाईट दगड अत्यंत कठिण असतो. तो कापण्यासाठी किंवा त्यावर कोरीव कलाकुसर करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हिऱ्याचे तुकडे लावलेली हत्यारे वापरावी लागतात.एक हजार वर्षांपूर्वी अशी कोणतीही साधने किंवा सुविधा नसतांना हे काम कसे केले असेल हेच मुळात आश्चर्य!
बृहदेश्र्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे तो मंदिराचा घुमट आणि कळस. मंदिराचा घुमट २१६ फुट उंच असून त्यावर ८० टन म्हणजे ८०,००० किलो वजनाच्या अखंड दगडातून कोरलेला कळस. एवढा अवजड कळस एवढ्या प्रचंड उंचीवर कसा ठेवला असेल.तसेच सिमेंट किंवा चुना न वापरता केवळ उखली पद्धतीने हे संपूर्ण मंदिर बांधण्यात आले आहे असं सांगितलं जातं. त्याकाळी साधन सामुग्री किंवा आधुनिक तंत्रज्ञान नसतांना १,०२,००० स्क्वेअर फुटाचं हे मंदिर कसे निर्माण केले असेल याचा विचार करुन मनुष्य थक्कं होतो.
बृहदेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर असून अकराव्या शतकाच्या सुरुवातीला ते बांधण्यात आले असल्याचे पुरावे आहेत.विशेष म्हणजे आजही हे मंदिर अत्यंत चांगल्या अवस्थेत असल्याने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मालिकेत या मंदिराची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद करण्यात आली आहे.
जगातल्या सर्वांत मोठ्या मंदिरात समावेश झालेल्या बृहदेश्वरमंदिराची निर्मिती चोल सम्राट राजराज चोल प्रथम यांनी इ.स. १००३ ते १०१० मध्ये केली आहे. सोळा फूट उंचीच्या भक्कम दगडी चबुतार्यावर ६६ मीटर उंचीचे हे 13 मजली मंदिर आपल्या निर्मात्यांची कर्तुत्व कथा सांगत शतकानुशतकं उभे आहे. या मंदिराचे प्रमुख वास्तुशास्त्रज्ञ कुजर मल्लन राजराज पेरुन्थचल हे होते. आजही त्यांचे वंशज तमिलनाडुत वास्तुशास्त्र आणि आर्किटेक्टची कामे करतात. चोल सम्राट राजराज यांनी या मंदिराला राजराजेश्वर असे नाव दिले होते परंतु तंजावर वर हल्ला करणार्या मराठा शासकांनी या मंदिराचे नामकरण बृहदेश्वरअसे केले. याचे कारण या मंदिरातील गर्भगृहात जी शिवपिंड आहे ती १२ फुट उंच आहे. तिची पूजा करण्यासाठी किंवा अभिषेक करण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो.
बृहदेश्वरमंदिर म्हणजे द्रविड़ वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य मंदिर आणि त्याची गोपुरे ११ व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच इ.स. १००३ ते १०१० या कालखंडात बांधण्यात आली त्यानंतर आलेल्या अनेक हिंदू राजांनी या मंदिरात नवनिर्माण, जीर्णोद्धार किंवा डागडूजीची कामे वेळोवेळी केली.मुघल शासकांनी अनेक वेळा या मंदिराचा विध्वंस केला परंतु त्यांच्या नंतर ज्यांनी हा प्रदेश जिंकला त्या हिंदू राजांनी पुन्हा हे मंदिर व्यवस्थित केले. भिंती वरील रंग उडालेली चित्रं पुन्हा रंगवून मंदिर नेहमीच सुशोभित ठेवले.
या मंदिरात भगवान शंकराच्या सर्वात भव्य पिंडी प्रमाणेच कार्तिकस्वामी,पार्वती अम्मा आणि नंदीची विशाल मूर्ती आहे.या मूर्ती सोळव्या सतराव्या शतकात नायक राजांनी निर्माण केल्या.मंदिरात संस्कृत आणि तमिल भाषेत शिलालेख आहेत विशेष म्हणजे हे सर्व शिलालेख अतिशय चांगल्या लिपित कोरलेले असून सहजगत्या वाचता येतात. या मंदिराच्या भिंतीवर असलेले लेख संस्कृत आणि तमिळ भाषेत असून ते अजूनही स्पष्टपणे ओळखू येतात.
बृहदेश्वर मंदिराची अनेक आश्चर्यजनक वैशिष्ट्ये सांगितली जातात त्यातील काही अशी
१) मंदिरावर ८०,००० किलोचा कळस कसा चढविला असेल.मंदिराचा घुमट हा एकाच विशालकाय दगडापासून बनविला असून त्याचे वजन अंदाजे 80 टन आहे. हा घुमट अष्टकोनी आहे. अचंबित करणारी बाब म्हणजे या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही.या घुमटाचा घेर हा 8.8 मीटर आहे. ज्या काळात क्रेन सारखी साधने नसतांना एवढा विशालकाय दगड इतक्या उंचीवर स्थापन करून अप्रतिम कोरीव काम कसे केले असेल ते एक कोडेच आहे.
२) मंदिरासाठी १,३०,००० टना पेक्षा अधिक ग्रेनाईट दगड वापरला. संपूर्ण ग्रॅनाईटने बनविलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या जवळपास साठ किलोमीटर पर्यंत कोणताही पहाड वा डोंगर नाही. असे म्हटले जाते की, तीन हजार हत्तीवरून हे दगड आणले गेले.
३) हे वैशिष्ट्ये पूर्ण मंदिर केवळ ७ वर्षांत बांधले.आजच्या काळात देखील ही गोष्ट अवघड अशक्य वाटतेत्यावेळी साधन सामुग्री आधुनिक तंत्रज्ञान आणि साधन नसतांना त्यावेळी हे काम कसे केले असेल या मंदिराची पूर्व – पश्चिम लांबी 240.90 मीटर आहे. तर उत्तर – दक्षिण रुंदी 122 मीटर आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला एक गोपुर आहे आणि इतर तीन दिशांना तीन प्रवेशद्वार आहेत.
४) बृहदेश्वर मंदिर एवढे भक्कम आहे की ६ मोठ मोठ्या भूकंपात देखील या मंदिराला क्षती पोहचली नाही. सिमेंट – चुना असे जोडणारे कोणतेही पदार्थ न वापरता या बांधकाम पूर्ण केले गेले. दगडांना locking system ने जोडले आहे. ही बाब अत्यंत अचंबित करणारी आहे. पाया खोदलेला नसल्याने या मंदिराला तरंगते मंदिर असेही म्हटले जाते. आश्चर्य असे की 2004 च्या त्सुनामीचा तडाखा या मंदिराचे काहीच नुकसान करू शकले नाही.
५) भगवान शिवा समोरचा नंदी देखील वैशिष्ट्येपूर्ण आहे. जगातला हा दुसर्या क्रमांकाचा मोठा नंदी आहे. 16 फुट लांब, ८.५ फूट रुंद आणि 13 फूटउंचीचा हा नंदी २०,००० किलो वजनाचा असून एकाच अखंड दगडातून कोरुन तयार केला आहे.
६) मंदिरा पासून किमान ६०किमि अंतरावर ग्रेनाईटच्या खाणी आहेत. इतक्य दुरून हे मोठमोठे ग्रेनाईट दगड कसे आणले असतील
७) ग्रेनाईट अत्यंत कठिन असतो त्यावर सूक्ष्म कलाकुसर करण्याची हत्यारे अवजारे साधनं त्यावेळी देखील असतील हे देखील आश्चर्यजनक वाटते.
८) बृहदेश्वर मंदिरांत वर्षानुवर्षे तुपाचे दिवे रात्रभर प्रज्वलित करण्यासाठी सम्राट राजराज यांनी या मंदिराला त्यावेळी ४००० गाई, ७००० शेळया-बकर्या , ३० म्हशी आणि २५०० एकर जमीन दान केलेली होती तसेच मंदिराची स्वछता आणि व्यवस्था ठेवण्यासाठी १९२ पगारी लोकांची नेमणूक केली होती.
लेखक : विजय गोळेसर मोबा ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Eleventh Centaury Bruhadeshwar by Vijay Golesar