इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १२
२५ एकर जागेवरील
कोलकत्त्याचे
दक्षिणेश्वर काली मंदिर!
(क्षेत्रफळ १,०१,१७१ स्क्वेअर फुट)
‘इंडिया दर्पण’च्या जगातील सर्वांत मोठे मंदिर या विशेष लेखमालेत आज आपण कोलकत्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा परिचय करून घेणार आहोत. देवांमुळेभक्त प्रसिद्ध होतात हे आपणांस ठाउक आहे परंतु येथे कालिमातेचे पुजारी आणि भक्त असलेल्या रामकृष्ण परमहंस यांच्या मुळ दक्षिणेश्वर काली मंदिर जगप्रसिद्ध झाले. राणी रासमणि यांनी २५ एकर जागेवर वसलेले हे मंदिर रामकृष्ण परमहंस यांच्या भक्तीमुळे जगप्रसिद्ध झाले आहे.

मो. ९४२२७६५२२७
उत्तर कोलकत्त्यात, बैरकपूर येथे विवेकानंद सेतूच्या कोलकत्ताकडील बाजूला हुगली नदीच्या काठावर दक्षिणेश्वर काली हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील मुख्य देवी भवतारिणी आहे. जिला सर्वजग काली माता याच नावाने ओळखतात. कोलकत्त्या मधील कालीघाट मंदिरानंतर हेच सर्वांत प्रसिद्ध मंदिर आहे. जान बाजारची राणी रासमणि यांनी इ.स. १८५४ मध्ये हे मंदिर बांधले. रामकृष्ण परमहंस या मंदिराचे पुजारी झाले. नंतरच्या काळांत त्यांच्या मुळच हे मंदिर जगप्रसिद्ध झाले.
इ.स. १८५७ ते १८६८ अशी सुमारे बारा वर्षे रामकृष्ण परमहंस या मंदिराचे प्रमुख पुजारी होते. त्यानंतर हे मंदिराच त्यांचे साधना स्थान झाले. या मंदिराला जी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली ती रामकृष्ण परमहंस यांच्या देवीवरील प्रगाढ भक्तीमुळे,त्यांच्या येथील वास्तव्या मुळे असेच म्हणता येईल. मंदिराच्या प्रमुख प्रांगणात उत्तर पूर्व दिशेला रामकृष्ण परमहंस यांचा कक्ष त्यांच्या ऐतिहासिक स्मृतींच्या स्वरुपांत संरक्षित करण्यात आला आहे. आजही संपूर्ण जगातून लाखो भाविक आणि पर्यटक रामकृष्ण परमहंस यांची ही साधना भूमी कर्म भूमी पाहण्यासाठी तिचे दर्शन घेण्यासाठी येतात.
मंदिर निर्मिती
कोलकत्त्याच्या जान बाजार नावाच्या भागातील जमीनदार राणी रासमणि यांना स्वप्नांत दृष्टांत झाल्यामुळे त्यांनी या मंदिराची निर्मिती केली. दक्षिणेश्वर काली मंदिराची निर्मिती इ.स. १८४७ पासून सुरु झाली. त्याकाळी हे मंदिर बांधायला आठ लाख रूपये खर्च आला आणि हे मंदिर बांधायला जवळ जवळ नऊ वर्षे लागली. २५ एकर जागेवर हे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ १,०१,१७१ चौरस फुट असून हे जगातले 12 वे सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे. मुख्य मंदिर ४६ फुट लांब-रुंद असून १०० फुट उंच आहे.
https://twitter.com/itsTanu22/status/1547516413627117568?s=20
मंदिराची वैशिष्ट्ये
हिरवळयुक्त निसर्गरम्य मैदानावर हे मंदिर उभे आहे. या मंदिराला कलाकुसरयुक्त भव्य बारा घुमट आहेत. मंदिराच्या चारी बाजूंना भगवान शंकराची १२ मोठ मोठी मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं ऑफ व्हाइट आणि गेरू रंगात रंगविलेली आहेत.
काली माते साठीच हे दक्षिणेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे. काली मातेचे हे विशाल मंदिर भव्य चबुतरयावर बांधलेले आहे अनेक पायर्या चढून मंदिरांत प्रवेश करावा लागतो. दक्षिण दिशेला हे तीन मजली भव्य मंदिर आहे. वरच्या दोन मजल्यावर नऊ घुमट सम प्रमाणात विभागलेले आहेत.घुमटाच्या छतावर आतून बाहेरून सुंदर कोरीव काम केलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत शिरताच स्वामी विवेकानंद यांचा परिव्राजक रुपतला भव्य पुतळा लक्ष्य वेधून घेतो.
काली माता हीच इथली प्रमुख देवता आहे. मुख्य गाभार्यात एक हजार पाकळया असलेल्या चांदीच्या कमळावर शस्त्रधारी काली माता भगवान शंकराच्या अंगावर उभी आहे. काली मातेच्या मुख्य मूर्ती भोवती भाविक बसतात किंवा ध्यान करतात. नवरत्न हरा प्रमाणे या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे हे मंदिर गंगेच्या काठावर आहे. गंगा नदीलाच येथे हुगली म्हणतात. विशेष म्हणजे मंदिरातून गंगेचे विशाल पात्र दिसते तसेच सुप्रसिद्ध हावडा ब्रिज देखील दिसतो.
https://twitter.com/PeepulTreeWorld/status/1361713701816967170?s=20
मंदिर प्रांगण
दक्षिणेश्वर काली मंदिरा समोरच नट मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या आसपास इतर देवतांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. दक्षिणेश्वर काली मातेचे हे मंदिर विश्व प्रसिद्ध असल्याने येथे वर्षभर भाविकपर्यटकांची गर्दी असते.
मंदिराच्या उत्तरेला राधाकृष्णाचे दालन आहे. पश्चिमेला बंगालच्या अटचाल रूपातील बारा शिव मंदिरं आहेत. चांदनी स्नान घाटाच्या चारी दिशांना ही शिव मंदिरं आहेत. सहा सहा मंदिरं घाटाच्या दोन्ही बाजूंना आहेत. मंदिराच्या उत्तर पश्चिम दिशेला भक्त निवास आणि कार्यालय यांच्या इमारती आहेत. येथे वर्षभर भाविकांचा राबता असतो.
लोकमाता राणी रासमणि
मंदिर परिसरांत राणी रासमणि यांचे मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रमाणेच राणी रासमणि बंगालच्या लोकमाता किंवा समाजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा बाबू राजेन्द्र दास यांच्याशी विवाह झाला. त्यांचे पती राजाराममोहन राय यांचे मित्र होते. विवाहानंतर राणी रासमणि यांनी शिक्षण घेतले तसेच त्यांच्या पतीच्या व्यवसायात त्या वाकबदार झाल्या. त्या चाळीस वर्षांच्या असतांना त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी बंगालमध्ये सतीची प्रथा जोरात होती. असे असतांना सामाजिक विरोधाला न जुमानता राणी रासमणि यांनी त्यावेळी आठ लाख रूपये खर्च करून हे मंदिरं उभारले. त्या स्वत: खालच्या जातीच्या असल्याने ब्राह्मण पुजारी त्यांच्या मंदिरांत काम करायला तयार होत नव्हते नंतर रामकृष्ण या मंदिरांत पुजारी म्हणून आले आणि पुढचा सगळा इतिहास जगजाहिर आहे. १९५५ साली त्यांच्यावर एक बंगाली चित्रपट तयार झाला. नुकतीच त्यांच्यावर बंगाली भाषेत एक टिव्ही सिरियल देखील प्रसारित झाली. १९९४ साली भारत सरकारने राणी रासमणि यांचे तिकिट काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
https://twitter.com/tnworldofficial/status/1395193370868260865?s=20
मंदिर दर्शन वेळा- पहाटे ५.३० ते १०.३० सायंकाली ४.३० ते ७.३०
संपर्क:- दक्षिणेश्वर कोलकत्ता,पश्चिम बंगाल
दूरध्वनी -०३३-२५६४५२२२
लेखक: विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple 25 Acre Area by Vijay Golesar
Kolkata Dakshineshwar Kali