कुत्तरदेव मंदिर
धनंजय दिगंबर बैरागी
आज आपण जगातील एकमेव अशा कुत्र्याच्या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत. या मंदिराची अनोखी अशी कहाणी आहे. इतिहास चाळला असता तिच्या नोंदी दिसून येतात. चला, तर वेळ न दवडता हे आपण जाणून घेऊया…
प्राचीन काळी कळवण प्रान्त आणि बागलाण प्रान्त येथील दोन्ही राजे मित्र होते. एका प्राचीन वेळेची घटना आहे. बागलाण प्रांतातील राजाचे काही पैसे कळवण प्रांतातील राजाकडे घेणे होते. ते पैशांसाठी तगादा लावत होते. कळवण प्रांतातील राजाकडे एक चाणाक्ष इमानदार कुत्रा होता. त्यांनी त्या कुत्र्याच्या गळ्यात एक चिठ्ठी बांधली की, राजे आज माझ्याकडे आपणास देण्यासाठी पैसे नाहीत. माझ्याकडे पैसे आले की मी आपणास देतो. तोपर्यंत हा माझा जिवलग चाणाक्ष कुत्रा आपल्या जवळ ठेवा. आणि तो कुत्रा बागलाण प्रांतातील राजाकडे गेला.
बागलाण प्रांतातील राजाने चिठ्ठी वाचली आणि त्या कुत्र्याला महालात ठेवले. एके दिवशी महालात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण त्या कुत्र्यामुळे सर्व दरोडेखोर पकडले गेले. राजाचा त्या कुत्र्यामुळे मोठा फायदा झाला. राजाने आपल्या पैशाची परतफेड त्या कुत्र्याने केली म्हणून त्याच्या गळ्यात एक चिठ्ठी बांधली की, राजे आपल्या इमानदार कुत्र्यामुळे माझ्या महालात दरोडा टाकणारे दरोडेखोर पकडले गेले. म्हणून मी आपल्या इमानदार कुत्र्याला परत पाठवत आहे. इमानदार कुत्रा कळवण प्रांतातील आपल्या राजाकडे निघाला त्याचवेळी कळवण प्रांतातील राजा घेतलेले पैसे परत देण्यासाठी बागलाण प्रांतातील राजाकडे जात होता. आणि दोघांची भेट बागलाण तालुक्यातील कळवण-बागलाण सीमेवर आज असलेल्या कुत्तरदेव मंदिराजवळ झाली.
त्याचवेळी समोरून येणारा आपला इमानदार कुत्रा कळवण प्रांतातील राजाला दिसला. राजाला वाटले आपला इमानदार कुत्रा पळुन आलाय. म्हणून दिसताक्षणी राजाने त्या इमानदार कुत्र्याला ठार केले. नंतर राजाने त्याच्या गळ्यात बांधलेली चिठ्ठी वाचली. आणि ढसाढसा रडाला. आपल्या हातून मोठी चूक झाली. आपल्या इमानदार कुत्र्याला आपण मारलं. म्हणून त्या इमानदार कुत्र्यासाठी कळवण प्रांतातील राजाने बागलाण-कळवण सीमेवर असलेल्या कुत्तरबारी घाटात त्या इमानदार कुत्र्याचे मंदिर बांधले. म्हणून त्या घाटाला कुत्तरबारी म्हणतात. आणि हे त्या इमानदार कुत्र्याचे मंदिर आहे
(लेखक हे किल्ला फाउंडेशन व इतिहास जतन किल्ला संवर्धन मोहीमेचे संस्थापक आहेत)
Worlds First Dog Temple in Nashik District