मुंबई – पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाचे दर गगनाला भिडल्याने आता इलेक्ट्रिक वाहने पर्याय म्हणून स्वीकारली जात आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसाठीचा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या वारंवार चार्जिंगचा असतो. परंतु आता इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी वेळ खूपच कमी वेळ लागणार आहे. कारण एबीबी कंपनीने एक नवीन चार्जर आणला आहे. हा जगातील सर्वात वेगवान चार्जिंग युनिट आहे, असा कंपनीचा दावा आहे.
नवीन टेरा 360 एक मॉड्यूलर चार्जर असून एकाच वेळी चार वेगवेगळ्या वाहनांना चार्ज करण्याची त्याची क्षमता आहे. एबीबी कंपनीचे म्हणणे आहे की हे नवीन चार्जर जास्तीत जास्त 360 किलोवॅटचे उत्पादन देते आणि याच्या मदतीने कार फक्त 15 किंवा त्यापेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकते. याबाबत एबीबी म्हणते की, नवीन टेरा 360 चार्जरची नाविन्यपूर्ण व्यवस्था वाहन वापरकर्त्याला चार्जिंग प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन करते आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे स्टेट ऑफ चार्ज आणि ईव्हीला पूर्ण चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ दाखवते.
विशेष म्हणजे हे चार्जर ऑफिस कॉम्प्लेक्स किंवा मॉल सारख्या कोणत्याही व्यावसायिक परिसरात देखील स्थापित केले जाऊ शकते. टेरा 360 चार्जर कमी जागा घेते आणि लहान डेपो किंवा पार्किंगमध्ये स्थापित केले जाऊ शकते. एबीबीच्या ई-मोबिलिटी डिव्हिजनचे अध्यक्ष फ्रँक मुहलोन म्हणाले की, जगभरात इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग नेटवर्क सुधारण्याचे प्रयत्न आहेत. तसेच इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जलद आणि सोयीस्कर असणे अत्यावश्यक आहे. टेरा 360 वेगवान चार्जिंग पर्याय प्रदान करून वापरकर्त्याच्या इतर गरजांची पूर्ण काळजी घेते.