इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या व्यक्तीला विशिष्ट व्यसन असेल तर तो त्यासाठी काहीही करु शकतो. त्यातही एखादा शौकिन असेल तर मग विचारुच नका. मग, ती वस्तू किंवा पदार्थ कुठलाही असो. एका व्यक्तीने तब्बल ४ कोटी रुपये खर्चून व्हिस्कीची एक बॉटल खरेदी केली आहे. त्यामुळे ती सर्वात महागडी व्हिस्की ठरली आहे. त्यामुळे जगभरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात व्हिस्की, ब्रँडी, वोडका, बिअर, जिन, संत्रा, ताडी, वाईन आदींचा समावेश होतो. देशी आणि परदेशी मद्यही असते. काही तर केवळ ब्रँडच्या नावानेच विक्री होतात. पण, सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती महागड्या व्हिस्कीची. पण व्हिस्की हा दारुचा नक्की काय प्रकार आहे? त्यात कोणत्या प्रकारची दारु असते? तर व्हिस्की आंबलेल्या धान्यांपासून बनवली जाते. त्यात सुमारे ४५ टक्के अल्कोहोल असते.
व्हिस्की संतुलित प्रमाणात घेतल्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. व्हिस्कीचे सेवन कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्हिस्कीच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि अॅलर्जीसारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो. विशेषतः ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्नायूंसाठी ते फायदेशीर आहे. याशिवाय यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात, असे सांगण्यात येते.
जपानी व्हिस्की अत्यंत महागडी असते, असे म्हटले जाते. तेथील एक व्हिस्कीची दुर्मिळ बाटली इस्तंबूल विमानतळावरील ड्युटी फ्री स्टोअरमध्ये अत्यंत महागडी म्हणजे तब्बल ४ कोटी १४ लाख रुपयांना विकली गेली आहे. कारण ही सिंगल माल्ट जपानी व्हिस्कीची बाटली आहे. ही व्हिस्की सुमारे ५५ वर्षे जुनी आहे. ही यामाझाकी श्रेणीची व्हिस्की आहे, तिला जास्त मागणी असून ती अधिक महाग आहे.
या दुर्मिळ दारूच्या बाटलीसाठी लिलाव बोली लावण्यात आली होती. ही महागडी दारू घेण्यासाठी ८ जणांनी बोली लावली होती. शेवटी, चीनमधील एका व्यक्तीने या दुर्मिळ बाटलीसाठी सर्वाधिक रुपयांची बोली लावली. मात्र, या व्यक्तीचे नाव अहवालात नमूद करण्यात आलेले नाही. एका अहवालानुसार, हाऊस ऑफ सनटोरीच्या इतिहासातील ही सर्वात जुनी सिंगल माल्ट व्हिस्की असून हे सन १९६०च्या दशकातील तीन अपवादात्मक सिंगल माल्टचे मिश्रण आहे.