इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया-युक्रेनमधील संघर्ष संपलेला नसताना आता पुन्हा एक युद्ध सुरू झाले आहे. अझरबैजान देशाने आर्मेनियावर हल्ला केला असून हे युद्ध पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याणं नाव घेत नाहीये, त्यातच आता आणखी दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. मंगळवारी अझरबैजान देशाने आर्मेनियावर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये यापूर्वीपासूनच भरपूर तणाव होता. मात्र, आता याचे युद्धात रुपांतर झाले आहे. अझरबैजानने आता आर्मेनियाच्या नागोर्नो-काराबाख या भागामध्ये ‘दहशतवाद-विरोधी’ अभियान सुरू केले असल्याचे देशाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या अंतर्गत काराबाख भागात केलेल्या हल्ल्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आर्मेनियाने याला शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हटले आहे. तसंच, अझरबैजानने मिसाईल-तोफांनी हल्ला केल्याचे आर्मेनियाने म्हटले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्हीकडून बेछूट गोळीबार केला जातो आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील १९९० च्या दशकात आणि २०२० साली या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काराबाख हा भाग अझरबैजानच्या सीमेत येतो. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्मेनियन लोकसंख्या असल्यामुळे आर्मेनिया देशाने यावर ताबा घेतला आहे. यामुळेच या दोन्ही देशांमध्ये कित्येक वर्षांपासून तणाव आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी हे युद्ध थांबवून चर्चेतून तोडगा काढावा असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
बॉम्बहल्ल्याला सुरुवात
नागोर्नो काराबाख प्रांतावरील वर्चस्वाच्या लढाईसाठी अजर्बैजानने आर्मेनियावर हल्ला केला असून त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आर्मेनियानेही अजर्बैजानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
World War Armenia Azerbaijan Conflict Attack Military