चिमण्यांची भाषा काय सांगते माहितीय का?
वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिऊ काऊ ला घास भरवता भरवता अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. ओट्यावर आपली आई, मावशी धान्य पाखडू लागली की पटकन 2/4 चिमण्या उडत येऊन ते धान्य आपल्या पिल्लांना नेत असत. हे दृश्य आता स्वप्नवत झाले आहे. चिमणी हा पक्षी जरी माणसाच्या वाडी वस्तीजवळ जवळ राहत असला तरी अतिशय घाबरट असतो.
चिऊचे घरटे
अनेक पक्षी चारा, कापूस, धागा, वाळलेली पाने आपल्या चोच व पायांनी शिवून स्वतःचे घरटे स्वतः बनवतात. परंतु चिमणीकडे हे टेक्निक नसते. चिमण्या अंडी द्यायच्या. 15 ते 20 दिवस अगोदर काडीकचरा झाडूच्या काड्या कापूस गोळा करून आडोशाच्या जागी त्याची गादी बनवतात. त्यावर अंडी देतात.
चिमण्यांचा संसार
दहा ते बारा दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यानंतर चिमणा-चिमणी सतत पिलांना मऊशार अन्नाचे बारीक बारीक गोळे आणून भरवतात. दहा ते बारा दिवसानंतर या पिलांना आळ्या व छोटे किडे आणून भरवले जातात. 22 ते 25 दिवसांनंतर ही पिले उडून जात. चिमण्यांचे संरक्षण
घरट्यासाठी जागा निवडताना चिमण्या विविध गोष्टींचे निरीक्षण करतात. त्यामध्ये आसपास मोठ्या पक्षांचा म्हणजे कावळा, बहिरी ससाणा, भारद्वाज, घुबड, घार यांचा वावर आहे का? कारण मोठे पक्षी एकतर चिमण्यांची अंडी तरी फोडतात, नाहीतर पिल्लू उचलून नेतात. त्याचप्रमाणे तीव्र उन्हाची दिशा देखील त्या बघतात. तसेच पाणी व पिलांसाठी अन्न, आळ्या युक्त झाडे, गोंगाट, घरट्याची उंची, मांजरीची ये-जा तसेच लपण्यासाठी काटेरी झुडपांचा परिसर अशा विविध संरक्षक गोष्टी चिमण्या बघतात. घरट्याची जागा ठरवताना मादी चिमणी पुढाकार घेते.
चिमण्यांचा चीवचीवाटाची भाषा
चिमण्या फक्त चिवचिवाट करतात, असे वाटते. परंतु त्यांची स्वतंत्र भाषा असते. म्हणजे असे एका दांडीवर चिमणा व चिमणी उलट सुलट उड्या मारत असतील तर त्यांना जवळपास घरट्याची जागा निश्चित मिळाली आहे. पाच ते सहा चिमण्या एकाच वेळी एकाच पद्धतीने चिवचिवाट करत असतील तर जवळपास मांजर आले आहे असे समजावे. भिंतीच्या आसपास एका ओळीत अनेक चिमण्या कर्कश्श ओरडत असतील तर जवळपास साप आहे समजावे. वाऱ्याच्या वेगाने येऊन चिमण्या आपल्या समूहात ओरडत असतील तर जवळपास मोठा शिकारी पक्षी आला आहे समजावे. समूहाकडे उडत येऊन परत आलेल्या दिशेला चिमण्या वळत असतील तर जवळपास पिण्यासोबतच डुंबायलाही पाणी साठा आहे, असे सुचवतात. चिमण्या सहसा परिसर बदलत नाहीत, परंतु नवीन आलेल्या चिमणी यांवर जोरदार हल्ला करतात.
चिमण्यांचे संरक्षण
छोटे सहा बाय सहा इंच आकाराचे लाकडी खोके अथवा प्लास्टिकचे चार इंच व्यासाचे पाईपचे एक फुट लांबीचे तुकडे अशी चिमण्यांची संरक्षक घरटी बनवावी. हल्ली बाजारात तयार फिडर व घरटी मिळतात. ती देखील लावावी. जवळपास असलेली काटेरी झुडपे तोडू नये. मोठ्या पक्षांचा हल्ला झाल्यास चिमण्या काटेरी झुडपात लपतात.
चिमण्यांचे खाद्य
तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी यांची भरड, पोळीचा कुस्करा, राळे यासोबतच प्यायला पाणी ठेवावे. जास्त खोल भांड्यात पाणी व खायला ठेवू नये.
शहरातील चिमण्या कमी का झाल्या?
नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, घरातील फोटो फ्रेम काल बाह्य होणे, कौलारू ऐवजी स्लॅबची घरे, वाढती वृक्षतोड, वाढते प्रदूषण, मोबाईल टॉवरच्या विद्युत् लहरी अशा विविध कारणांनी शहरातील चिमण्यांची संख्या चिंताजनकरित्या कमी झाली आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्याची कारणे काहीही असोत आपण आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये अथवा उंच सावलीत चिमण्यांसाठी सुरक्षित घरटी बनवावीत. त्यांना थोडे दाणापाणी ठेवावे आणि मग बघा चिऊताई आपल्या पिलांबरोबर तिथे कशी चिवचिवाट करत येते. आपला परिसर आनंदाने भरून टाकते.
या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या असे म्हणण्याची वेळ वाढत्या शहरीकरणामुळे आपल्यावर आली आहे. आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने संकल्प करून आपण प्रत्येक जण आपल्या टेरेस अथवा पार्किंग मध्ये चिऊ साठी दोन घरटी लावू आपल्या पुढच्या पिढीला चित्रात नाही तर प्रत्यक्षात चिऊ दाखवू..
(पं. दिनेश पंत- सेव स्पॅरो तसेच स्पॅरो कॉलनी प्रकल्पाचे संयोजक)