मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी किंवा आपला विक्रम प्रस्थापित व्हावा, यासाठी भारतातील अनेक व्यक्ती आगळेवेगळे विक्रम करत असतात. वेगवेगळ्या खेळांच्या बाबतीतही काही विक्रम प्रस्थापित होतात. क्रिकेटमध्ये तर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. मुंबईच्या खेळाडूने देखील असाच एक आगळावेगळा विक्रम केला आहे. मुंबईचा क्रिकेट फलंदाज सिद्धार्थ मोहिते यांनी सलग तीन दिवस नेटचा सराव करून सर्वाधिक प्रदीर्घ फलंदाजी करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यासाठी 72 तास आणि पाच मिनिटे क्रीजवर घालवलेल्या या भारतीयाला आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची ओळख मिळण्याची प्रतीक्षा आहे.
सिद्धार्थ मोहिते यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद होऊ शकते. सुमारे 19 वर्षीय मोहिते यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी 72 तास आणि पाच मिनिटे फलंदाजी करून देशबांधव विराग मानेचा 2015 मध्ये 50 तासांचा विक्रम मोडीत काढला. याबाबत मोहिते म्हणाले की, ‘मी जे काही प्रयत्न केले त्यात यश आल्याचा मला खूप आनंद आहे. मी वेगळा खेळाडू आहे हे प्रेक्षकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता. मोहिते यांच्या प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनीही मोहिते यांना त्यांच्या प्रयत्नात मदत केली. या बाबत मोहीते म्हणाले, यापुर्वी सगळे माझ्या प्रशिक्षणासाठी नकार देत होते. त्यानंतर मी ज्वाला यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मला जे आवश्यक प्रशिक्षण आहे ते मला दिले. तसेच गोलंदाजांच्या एका गटाने मोहिते यांना संपूर्ण सत्रात साथ दिली. नियमानुसार फलंदाजाला तासाभरात पाच मिनिटे विश्रांती घेता येते. आता मोहिते यांचे रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवण्यात आली आहेत.