चला, मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न करू या!
१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त विशेष लेख..
मुकुंद बाविस्कर (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
मनुष्याच्या शरीरात किती सुदृढ असले तरी मनस्वास्थ्य किंवा मनस्थिती ठीक नसेल तर सर्व काही व्यर्थ ठरते, असे म्हटले जाते. मानसिक आरोग्य बिघडल्याने त्यातून आत्महत्या किंवा विकृत मनोवृत्ती तयार होते. त्यामुळेच आपल्या देशात वाढत्या आत्महत्या मागे मानसिक आरोग्य बिघडल्याचे कारण सांगण्यात येते. त्याचप्रमाणे युवा पिढी तरी तरी वाढत्या ताणतणावांमुळे मानसिक स्थिती बिघडल्याचे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यासारख्या शारीरिक आजारांची लक्षणे प्रमाण वाढल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात. त्यासाठी मानसिक आरोग्य विषयक जनजागृतीसाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत.
दि.10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुदृढता व जागण्याची अवस्था होय. मनुष्याचे सर्व वयोगटात योग्य शारीरिक तसेच मानसिक स्थिती योग्य असणे म्हणजे मानसिक आरोग्य होय, अशी आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. उच्च रक्तदाब, जठर व आतड्यातील व्रण यासारख्या रोगांसाठी मानसिकता बिघडणे कारणीभूत ठरते, असे संशोधनातून स्पष्ट झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मनोविकार होण्यासाठी मज्जा संस्थेतील काही बिघाड कारणीभूत ठरतात. तसेच परंतु सध्याच्या काळात मानसिक ताणतणावामुळे शारीरिक आजार वाढले आहेत. विशेषत: तरुण पिढीमध्ये धावपळीचे आयुष्य, वाढती स्पर्धा, कामाच्या ठिकाणी ताण-तणाव यामुळे मानसिक आजार वाढल्याचे सांगण्यात येते.
यंदा तर कोरोनामुळे जगभरात गेल्या आठ महिन्यांत तर कोरोना बरोबरच अन्य आजाराची भीती वाढली आहे. त्यातच व्यवसायाची चिंता, कुटुंबाची काळजी, उदासीनता या विचारांतून आणि भावनांतून मानसिक आजारात आणखी वाढ झाल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी व्यक्त केले. मानसिक आरोग्य हे सार्वजनिक आरोग्याच्या दुर्लक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. जगभरात 1 अब्ज लोक मानसिक विकृतीसह जगत आहेत. स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर मानसिक विकारांमुळे ग्रस्त असलेले लोकांचे आयुष्य सामान्य लोकांपेक्षा 10-20 वर्षे कमी होत आहे.
त्याचप्रमाणे आत्महत्येच्या कारणाने दर वर्षी सुमारे 8 लाख लोक जीव गमावतात. त्यातच सध्या जगभरातील कोट्यावधी लोकांना कोविड 19 साथीच्या आजाराने ग्रासले आहे, ज्याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मानसिक आरोग्यामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी अधिक गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. जगभरात काही मोजक्या देशातील लोकांना दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा मिळत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या एकूण व्यक्तींपैकी सुमारे 85 टक्के लोक उपचारांपासून वंचित राहतात.
जागतिक आरोग्य संघटनेचच्या एका सर्वेक्षणानुसार विकसनशील देशामध्ये आरोग्यावरील एकूण खर्चापैकी केवळ 1 टक्के मानसिक आरोग्यावर खर्च केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल साक्षरता बाळगणे आवश्यक आहे. यासाठी
जागतिक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर, सरकारी नियोजनात, सामाजिक वातावरणात सगळीकडे मानसिक आरोग्याचा जागर करणे गरजेचे आहे, डॉ. सोननीस यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर समाजाच्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, स्वतःच्या आणि सर्वांच्या मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे यंदाचे ब्रीदवाक्य आहे, मानसिक आरोग्य सर्वांचा हक्क आणि अधिक गुंतवणूक: अधिक उपलब्धता, असे आहे.
याकरिता सर्वप्रथम ज्यांना मानसिक आजार आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून समजुन घेणे आवश्यक आहे. या व्यक्तींना समाजात, नातेवाईकांत, शेजारी, कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे सामावून घ्यावे,
तसेच त्यांची मानसिक आजारावरुन टिंगल, करू नये, त्यांना कमी लेखू नये, सर्वांनी एकमेकांमधील संवाद, भावनिक संपर्क नियमित करणे, वाढवणे गरजेचं आहे, असेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)