नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाची तिसरी लाट आता कमी झाली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूच्या विविध रूपांबाबत (व्हेरिएंट) इशारा दिला आहे. महामारीचे हे शेवटचे दिवस आहेत, ती संपत आली आहे, असे अजिबात समजू नका. कारण कोरोनाचे अनेक म्युटेशन पाहण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळातही त्याचे अनेक व्हेरिएंट येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
स्वामिनाथन यांच्यापूर्वी डब्ल्यूएचओ कोविड १९ च्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन यांनीसुद्धा इशारा दिला होता. त्या म्हणाल्या, की ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नाही. या विषाणूबद्दल आम्हाला बरीच माहिती मिळाली आहे. परंतु सगळी माहिती मिळाली असे म्हणणे घाईचे ठरेल. आम्ही विषाणूवर नजर ठेवून आहोत. परंतु त्याचे अनेक प्रकारे म्युटेशन होत आहे. सध्या ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आहे. परंतु तो शेवटचा व्हेरिएंट नाही. पुढे इतर काही व्हेरिएंटही येऊ शकतात.
त्या म्हणाल्या, की लसीकरणाची प्रक्रिया कायम सुरू ठेवली पाहिजे इतके प्रयत्न आपण करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉनच्या आधारावर डब्ल्यूएचओ कोरोनाच्या इतर व्हेरिएंटवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाचे BA.2 हे रूप BA.1 पेक्षाही वेगाने फैलावत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण खूपच कमी झाले आहेत. प्रथमच कोरोनाचे एक हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी ३० डिसेंबर २०२१ रोजी सर्वात कमी रुग्ण आढळले होते. गेल्या २४ तासात दिल्लीमध्ये ९७७ रुग्ण आढळले आहेत. तेथील पॉझिटिव्हिटी दर घटून १.७३ झाला आहे. दिल्लीत सध्या चार हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनामुळे मृत्यूची प्रकरणे अजूनही समोर येत आहेत. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे बहुतांश रुग्ण घरच्या घरीच उपचाराने बरे झाले आहेत.