नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) : स्पेनमध्ये होणाऱ्या ७७ व्या जागतिक होमिओपॅथी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सारंग रहाळकर, डॉ. योगेश होनराव आणि डॉ. अशर शेख जात आहेत. युरोपीय देशातील मान्यताप्राप्त ‘लिगा मेडिकोरम होमिओपॅथिका इंटरनॅशनल’ या संस्थेतर्फे येत्या २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान सेविल शहरात ही परिषद होणार आहे.
नाशिकमधील हॅनिमनियन होमिओ फोरमचे (HHF) संस्थापक डॉ. रहाळकर यांनी, एका रुग्णाला झालेला रक्ताचा कर्करोग आणि प्लीहेची मोठी वाढ यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण होमिओपॅथीच्या औषधाने केले आहे. त्यामुळे पोटातील गाठीही नाहिशा झाल्या. स्पेनच्या परिषदेत डॉ. रहाळकर या उपचाराची माहिती सादर करणार आहेत.
खांद्याजवळील रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या दुर्मिळ आजारावर डॉ. होनराव यांनी यशस्वी उपचार केले. तर महिलांच्या गर्भाशयातील पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमवर डॉ. आशर यांनी उपचार केले. फोरमचे हे दोन्ही संचालक स्पेनच्या परिषदेत आपली विशिष्ट व्याधीवरील यशस्वी उपचार पद्धती (प्रोटोकॉल) सादर करणार आहेत.