बुद्धीबळ विश्वचषक
नेपोम्नियाचिने दुसरा डाव जिंकून घेतली आघाडी
कझाकस्तान येथील अस्ताना येथे ९ एप्रिल २०२३ पासून सुरु झालेल्या रशियाच्या आयन नेपोम्नियाची उर्फ नेपो (एलो रेटिंग २७९५) विरूध्द चीनच्या डिंग लिरेन (एलो २७८८) यांच्यातील बुद्धिबळ जगतज्जेतेपद स्पर्धेत पहिला डाव अपेक्षेप्रमाणे बरोबरीत सुटल्यावर काळ्या मोहरा घेउन खेळणाऱ्या नेपोने दुसरा डाव जिंकून एक गुणाची नुसती आघाडीच घेतली नाही तर दबावाखाली खेळत असलेल्या लिरेन वर आणखी दबाव वाढवला.
या स्पर्धेचे समालोचन करीत असलेल्या भारताचा विश्वनाथ आनंद देखील या विजयाने चकीत झाला . कारण त्याने कालच पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर भाकीत केले होते की पहिले ४-५ डाव एकमेकांची तयारी जोखण्यात अनिर्णित राहतील आणि खरी लढाई त्यानंतर सुरु होइल.
तथापि आज ज्या पध्दतीने लिरेन केवळ २९ चालीत पराभूत झाला आणि ज्या आक्रमकरित्या नेपो खेळला त्यावरून नेपो नियोजित १४ डाव होण्यापूर्वीच जिंकेल असे मत आनंद सह काही माजी खेळाडूनी व्यक्त केले ! माजी महिला जगतज्जेती जुडीत पोल्गर तर म्हणाली,” It was a frightning and dominant display of superiority by Nepo and I am afraid the championship will end sooner before the 14th round .”
काल पहिला डाव ६९ चाली झाल्यानंतर बरोबरीत सुटला असला तरी जाणकारांच्या मते वर्चस्व नेपोचेच दिसले. सामना संपल्यानंतर झालेल्या वार्ताहार परिषदेत लिरेनने आपण प्रथमच जगज्जेतेपद स्पर्धा खेळत असल्याने खूपच दबावाखाली आहोत, त्यामुळे मनासारखे खेळता आले नाही असे कबूल केले तसेच हवी तशी तयारी झाली नसल्याचेही कबूल केले.
लिरेंनची देहबोली पराभूत खेळाडूसारखी वाटत होती असे भारतीय ग्रॅंडमास्टर प्रवीण ठिपसे ने सांगितले. तो तर असेही म्हणाला की त्याने पहिल्या डावात ८वी चाल इतकी चुकीची केली की तो विश्वविजेतेपदाची लढत खेळतो आहे असे वाटलेच नाही. आता पहिले दोन डाव झाल्यावर मंगळवारच्या विश्रांतीनंतर बुधवारी लढत पुन्हा सुरु होईल. त्यावेळी चीनची प्रसिद्ध लढाऊ वृत्ती दाखवून डिंग लिरेन नव्याने नेपोशी दोन करतो की पुन्हा दबावामुळे त्याच चुका करतो या कडे जगातील बुद्धिबळ शौकीन उत्सुकतेने पाहतील. कार्लसनने अंतिम लढत न खेळण्याचा निर्णय जाहीर केल्याने नशीबाने अंतिम लढाईसाठी लिरेन पात्र ठरला असला तरीही स्वतःच्या आणि देशाच्या इज्जतीसाठी तो पुन्हा कसब दाखवेल का , बघू या !
दीपक ओढेकर
deepakodhekar@gmail.com
World chess championship 2023 Ian Nepomniachtchi Ding Liren