नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू बांधला जातो. नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्यात भारताच्या विविध भाषा आणि इतर देशांच्या भाषांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक दालने आहेत हे पाहून त्यांनाआनंद झाला. या पुस्तक मेळ्यात पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी जगभरातील साहित्य उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून निर्धारित पुस्तके वाचण्याव्यतिरिक्त, शालेय मुलांनी विविध विषयांवरील निरनिराळा प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत. त्यांनी सांगितले की, यामुळे मुलांना आपल्या क्षमतांचा शोध घेण्यास मदत होईल आणि त्यांना चांगली व्यक्ती बनण्यास मदत होईल.
मुलांसाठी पुस्तके तयार करणे आणि त्यांचा प्रचार करणे याला विशेष महत्त्व देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सर्वांना केले. आपल्या मुलांमध्ये आपण विकसित करू शकतो अशा सर्वोत्तम सवयींपैकी एक म्हणजे पुस्तके वाचण्याची आवड, असे त्या म्हणाल्या. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने ते एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणून मुलांमध्ये पुस्तकाची आवड निर्माण करण्याचे काम स्वीकारले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.